"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
दुर्गाबाईंची व्यावसायिक घडी बसत होती. मात्र कौटुंबिक जीवनात त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. वडील खूप थकले होते; परंतु लाड कुटुंबातील इतर कोणीही अर्थार्जनाची जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. उलटपक्षी, भाऊ मनोहरचा खर्च दिवसेंदिवस वाढत होता. मनोहर काहीही कमवत नव्हता; परंतु आई मात्र त्याला कायम पाठीशी घालत होती. अखेर लाड कुटुंबाने राहते घर विकून लहान घरात स्थलांतर केले. विश्वनाथ यांचीही तीच परिस्थिती होती. त्यांना पुरेसा पगार नव्हता; पण जिमखाना आणि इतर छंद मात्र कमी होत नव्हते. त्यांच्या सोयीसाठी दुर्गाबाईंनी गाडी खरेदी केली; परंतु त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही.
दुर्गाबाईंच्या आयुष्यावर पुन्हा एकदा नियतीने क्रूर आघात केला. ‘सवंगडी’ या चित्रपटाचे पुण्यात चित्रीकरण सुरू होते. त्या दर शनिवारी सकाळी मुंबईला जात आणि शनिवार-रविवार विश्वनाथ आणि मुलांबरोबर घालवून सोमवारी चित्रीकरणासाठी पुन्हा पुण्याला परत येत. १९३८ चा ऑगस्ट महिना होता. मुंबईत त्यांनी विश्वनाथ आणि मुलांसोबत नारळी पौर्णिमा साजरी केली. चौघांनी आई-वडिलांकडे, म्हणजे लाड यांच्या घरी सणाचे जेवण केले. रात्री दुर्गाबाईंना पुण्याच्या गाडीत सोडायला विश्वनाथ आले. बकुलला सुटी असल्याने तोही दुर्गाबाईंबरोबर पुण्याला गेला. हरिन मात्र लाड यांच्या घरीच होता.
सोमवारी नेहमीप्रमाणे दुर्गाबाई पुण्यातल्या नटराज प्रॉडक्शनच्या कार्यालयात बसल्या होत्या. अचानक फोनची घंटा वाजली. विश्वनाथ यांचा अपघात झाला असून ते हॉस्पिटलमध्ये आहेत असा निरोप त्यांना मिळाला. दुर्गाबाई आणि बकुल तातडीने मुंबईला निघाले. मात्र प्रत्यक्षात विश्वनाथ यांनी आधीच या जगाचा निरोप घेतला होता. सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विश्वनाथ यांची गाडी ग्रँटरोड मार्केटजवळ रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दिसली. ते गाडीत स्टिअरिंग व्हीलवर डोके ठेवून निपचित पडले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांनी विश्वनाथ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे निदान केले.
दुर्गाबाईंवर हा एक फार मोठा आघात होता. घरच्या अर्थार्जनाची जबाबदारी प्रामुख्याने दुर्गाबाईंच्याच खांद्यावर होती. घरातील कमीजास्त पाहणे आणि मुलांचे भविष्य घडवणे यातही दुर्गाबाईंचा मोठा वाटा होता. मात्र मुलांसाठी वडिलांचे प्रेम आणि छत्र महत्त्वाचे होते. त्यांच्या उपस्थितीमुळे मुलांना कुटुंबाच्या पूर्णत्वाची जाणीव होत असे. दुर्गाबाई कामानिमित्त बहुतांशी वेळ मुंबईबाहेर असत. अशा वेळी वडिलांचे मुंबईत असणे मुलांसाठी दिलासादायक ठरत असे. विश्वनाथ यांच्या मृत्यूच्या वेळी दुर्गाबाई ३३ वर्षांच्या होत्या, मोठा बकुल तेरा वर्षांचा तर लहान हरिन केवळ अकरा वर्षांचा होता. संपूर्ण कुटुंबावर दुःखाची छाया पसरली. तिघांसमोर संपूर्ण आयुष्य उभे होते.
दुर्गाबाईंच्या वडिलांनी त्यांचे सांत्वन केले. मुलांचे भविष्य आणि त्यांचे स्वतःचे करिअर समोर होते. दुर्गाबाईंनी नटराज प्रॉडक्शनची सुरुवात केली होती आणि त्यांच्या हातात दोन चित्रपटही होते. वडिलांनी या सगळ्या जबाबदाऱ्यांची दुर्गाबाईंना जाणीव करून दिली आणि कणखर मनाने परिस्थितीला सामोरे जाण्याचे मनोबल त्यांच्या मनात निर्माण केले. वृद्ध खोटे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ते त्यांच्या दादरच्या घरी गेले. परंतु त्यांना तेथे कटू अनुभव आला. खोटे कुटुंबाने विश्वनाथाच्या मृत्यूला दुर्गाबाई आणि मुलांना जबाबदार धरले. स्वतःच्या व्यावसायिक कारकिर्दीकडे लक्ष देताना दुर्गाबाईंनी विश्वनाथच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले, असे त्यांचे ठाम मत होते. पांडुरंगराव लाड कोणताही वाद न घालता उलट्या पावली परत आले.
दुर्गाबाईंच्या अडचणींना विराम नव्हता. विश्वनाथ यांचे निधन होऊन जेमतेम वर्ष झाले आणि १९३९ मध्ये त्यांचे वडील, पांडुरंगरावांचे निधन झाले. दुर्गाबाईंच्या व्यावसायिक वाटचालीत आणि कौटुंबिक अडचणीत वडील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. दुर्गाबाईंनी हा मोलाचा आधार गमावला. वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या स्वभावातही फार फरक पडला. तिच्या मनोहरवरील अवास्तव प्रेमाने परिसीमा गाठली. मनोहरपुढे दुर्गाबाईंची मुलेदेखील तिला गौण वाटू लागली. मुलांनाही हा दुजाभाव जाणवला. त्यांना आजीकडे राहण्यात रस उरला नाही. वडिलांच्या पश्चात आई आणि मनोहरची काळजी घेईन, असे वचन दुर्गाबाईंनी आपल्या वडिलांना दिले होते. मुलांचे भविष्य आणि आईची काळजी या कात्रीत दुर्गाबाई अडकल्या.