"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
बानूने कॅथेड्रल स्कूलचा ‘सिनियर केंब्रिज’ अभ्यासक्रम पूर्ण करून १९२२ मध्ये मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सेंट झेवियर्स कॉलेजची व्हिक्टोरियन शैलीतील वास्तू — कोरीव खांब, लांब दालने आणि उंच कमानी पाहून ती भारावून गेली. कॅथेड्रल शाळेच्या तुलनेत येथे खूपच स्वातंत्र्य होते. कॉलेजमधल्या व्याख्यानांची वेळ केवळ १० ते १.३० अशी होती. इतर वेळात क्रीडा, सामाजिक कार्यक्रम, वादविवाद, सहली इत्यादींसाठी भरपूर वाव होता. कॅथेड्रलमधून सिनियर केंब्रिजची परीक्षा दिलेली असल्याने बानूला झेवियर्सचा अभ्यासक्रम सोपा वाटत होता. कॅथेड्रलमध्ये घडलेल्या तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे तिने कॉलेजमधल्या तरुणांवर सहज छाप पाडली. बानूला त्याचा अभिमान होता. कॉलेजमधले जीवन बानूला सुखकर अनुभव देत होते. कॉलेजमध्ये बानूचे पहिले वर्ष आनंदात गेले.
परंतु हा आनंद बानूच्या नशिबात फार काळ नव्हता. लाड घराण्याचे मुंबईतील काशिनाथ दीनानाथ खोटे यांच्या घराण्याशी खूप चांगले संबंध होते. श्रीमंती आणि सामाजिक प्रतिष्ठा या दोन्ही बाबतीत खोटे घराणे लाड घराण्याइतकेच मानले जात होते. खोटे कुटुंबाकडे मुंबई, पुणे आणि पाचगणी इत्यादी ठिकाणी बंगले, व्यावसायिक मालमत्ता आणि मोठी सामाजिक प्रतिष्ठा होती. बानू काशिनाथ खोटे यांना ‘काका’ असेच संबोधत असे, तर काशिनाथ यांच्या पत्नी आनंदीबाई यांना ती ‘काकी’ म्हणत असे. काशिनाथ-आनंदीबाई यांचा एकुलता एक मुलगा विश्वनाथ इंग्लंडमध्ये शिकत होता. सारे त्याला लाडाने ‘विशा’ म्हणत असत. लहानपणी बानूला विश्वनाथला भेटण्याची अनेकदा संधी मिळाली होती. दोन्ही कुटुंबे लोणावळ्याला सहलीला गेली असताना बानू आणि विश्वनाथ यांचा बराच काळ सहवास झाला होता. मात्र पुढे विश्वनाथ इंग्लंडला गेला आणि बानूही आपल्या शिक्षणात गुंतली. त्यामुळे दोघांची भेट क्वचितच होत असे.
आनंदीबाईंची प्रकृती फारशी चांगली नव्हती. आनंदीबाई ठीक असतानाच विश्वनाथाचे लग्न व्हावे असा विचार काशिनाथ आणि आनंदीबाईंनी केला आणि त्यांनी तातडीने विश्वनाथला भारतात बोलावून घेतले. विश्वनाथसाठी वधू म्हणून बानूची मागणी खोटे कुटुंबाकडून करण्यात आली. खोटे कुटुंबाची श्रीमंती आणि प्रतिष्ठा पाहता या प्रस्तावाला नाही म्हणण्याचे कारण पांडुरंगराव आणि मंजुळाबाईंना वाटले नाही. बानूला आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करायचे होते; मात्र दोघांनी तिची समजूत काढली आणि तिला लग्नासाठी तयार केले. लग्नानंतरही शिक्षण चालू राहील, या भ्रमात बानू होती. मात्र आनंदीबाईंचा याला स्पष्ट विरोध होता याची तिला याची कल्पना नव्हती.
१९ जून १९२३ रोजी बानूचे विश्वनाथशी मोठ्या थाटामाटात लग्न झाले. त्यावेळी बानूचे वय अवघे १८ वर्षे होते. लग्नसोहळा सी. पी. टँक येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या बागेत पार पडला. समाजातील नामवंत व्यक्ती, व्यापारी, राजघराणी आणि न्यायाधीश समारंभाला उपस्थित होते. या लग्नसोहळ्याची त्या काळच्या प्रतिष्ठित समाजात मोठी चर्चा झाली. लग्नानंतर बानूचे नाव ‘दुर्गा’ ठेवण्यात आले. बानू लाड लग्नानंतर दुर्गाबाई खोटे म्हणून ओळखली जाऊ लागली.
खोटे यांच्या घरात विश्वनाथ आणि दुर्गाबाईंशिवाय सासरे काशिनाथराव, सासू आनंदीबाई आणि लालनाथ असे तिघेजण होते. लालनाथ हा काशिनाथरावांचा पुतण्या. लालनाथच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याला काशिनाथरावांनीच वाढवले. लालनाथ अविवाहित होता. त्याचे फारसे शिक्षण झालेले नव्हतेच, तसेच तो नोकरी किंवा उपजीविकेसाठी कोणते कामही करत नसे. दुर्गाबाईंचे बालपण अतिशय आनंदात गेले होते; मात्र खोटे यांच्या घरात त्यांना वेगळा अनुभव येत होता. काशिनाथराव आपल्या व्यवसायात मग्न असत, त्यामुळे घरात त्यांचा फारसा सहभाग नव्हता. घराचा संपूर्ण कारभार आनंदीबाईंकडे होता. आनंदीबाई स्वभावाने अतिशय कडक आणि अहंकारी होत्या. घरात सामान्य संवाद किंवा विनोदाला कोणतीही जागा नव्हती. लग्नानंतर दुर्गाबाईंनी शिक्षण थांबवले पाहिजे, ही प्राथमिक अटच आनंदीबाईंनी त्यांच्यासमोर ठेवली. दुर्गाबाईंवर हा एक फार मोठा आघात होता.
विश्वनाथची वेगळीच तऱ्हा होती. त्याचे कामाकडे फारसे लक्ष नव्हते. वडील व्यवसाय सांभाळत आहेत आणि सर्व काही सुरळीत चालले आहे, त्यामुळे आपल्याला त्यात फारसे लक्ष घालण्याची गरज नाही, असा समज विश्वनाथने करून घेतला होता. त्यामुळे सकाळी काही वेळ कार्यालयात गेल्यानंतर दिवसाचा बहुतांश वेळ तो जिमखान्यात बिलियर्ड्स आणि पत्ते खेळण्यात घालवत असे. दुर्गाबाईंनी कामाबद्दल विचारणा केल्यास विश्वनाथ उडवाउडवीची उत्तरे देत असे. दोघांमध्ये वैचारिक किंवा गंभीर संवाद फारसा होत नसे. अशा प्रकारे, सुरुवातीची दोन ते तीन वर्षे दुर्गाबाईंसाठी जवळजवळ ‘तुरुंगवासासारखी’ ठरली.
विश्वनाथ आणि दुर्गाबाईंच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली आणि १९२५ मध्ये दुर्गाबाईंनी पुत्राला जन्म दिला. त्याचे पाळण्यातले नाव नारायणनाथ ठेवण्यात आले; मात्र सर्वजण त्याला बकुल या नावानेच हाक मारू लागले. आनंदीबाईंना घरात मुलगी नको होती, त्यामुळे दुर्गाबाईंना मुलगा झाला याचा त्यांना फार आनंद झाला. बकुलच्या आगमनाने घरात आनंद पसरला. बकुलच्या संगोपनात गुंतल्यामुळे दुर्गाबाईंचा वेळही आनंदात जाऊ लागला.
१९२६ च्या ऑगस्ट महिन्यात दुर्दैवाने खोटे कुटुंबाच्या आर्थिक सुबत्तेचा बुडबुडा फुटला. काशिनाथराव शेअरबाजारातील सट्टा व्यवहार करीत असत आणि त्यात त्यांना फार मोठे नुकसान सोसावे लागले. काशिनाथरावांनी बाजारातून अमाप कर्ज घेतले होते, आणि सर्व कर्जदार वसुलीसाठी त्यांच्या मागे लागले. दुर्गाबाईंचे वडील पांडुरंगराव लाड यांना ही बातमी समजली. काही कायदेशीर किंवा आर्थिक मदत लागल्यास ती देण्याची तयारी त्यांनी दाखवली; मात्र काशिनाथरावांनी सर्व काही सुरळीत होईल असे आश्वासन देत ती मदत नाकारली. परंतु दुर्दैवाने काशिनाथरावांची पाठ सोडली नाही. अखेर त्यांना आपली सर्व संपत्तीच नव्हे तर राहते घर देखील विकावे लागले. एकेकाळी गर्भश्रीमंत असलेले खोटे घराणे प्रत्यक्षात रस्त्यावर आले.
दुर्गाबाईंना तो धक्का अस्वस्थ करणारा ठरला. एखादी नोकरी किंवा व्यवसाय करून चरितार्थासाठी पुरेसे कमावण्याचे आश्वासन विश्वनाथने दिले होते. परंतु दुर्गाबाईंना त्याची शाश्वती नव्हती. त्यांना स्वतःलाही काहीतरी करून अर्थार्जन करणे आवश्यक आहे, याची जाणीव झाली. बकुलला शिकवून त्याला एक जबाबदार माणूस बनवणे हेच त्यांच्या पुढील आयुष्याचे ध्येय होते. दुर्गाबाईंच्या वडिलांनी विश्वनाथ आणि दुर्गाबाईंना लाड मॅन्शनमध्ये एक घर देऊ केले. दोघे बकुलसह लाड मॅन्शनमधील नव्या घरात राहायला गेले. मात्र याशिवाय अजून काही मदत वडिलांकडून घ्यायची नाही, असे दुर्गाबाईंनी ठरवले. याच सुमारास दुर्गाबाई दुसऱ्यांदा गरोदर राहिल्या. नव्या घरात गेल्यानंतर १९२७ मध्ये विश्वनाथ-दुर्गाबाईंना दुसरे पुत्ररत्न झाले. दुसऱ्या मुलाचे नाव हरिन ठेवण्यात आले.
अर्थार्जनाची संधी दुर्गाबाई सतत शोधत होत्या. पदवीशिक्षण नसल्याने मोठी नोकरी मिळणे अवघड होते. त्यांनी इंग्रजीचे खाजगी वर्ग सुरू केले. त्यातून थोडी कामे सुरू झाली. विश्वनाथला देखील नगरपालिकेत नोकरी मिळाली. विश्वनाथला महिना रु. १५० आणि दुर्गाबाईंना महिना रु. ३० ते ४० मिळू लागले. अर्थातच ही मिळकत चौघांना पुरेशी नव्हती. दुर्गाबाई अजून काही कामाच्या शोधात होत्या.
१९३० च्या सुरुवातीला चित्रपटसृष्टीतील श्री. वाडिया अचानक दुर्गाबाईंच्या बहीण शालूताई यांना भेटायला आले. ते दोघे शाळेतील जुने मित्र होते. ते ‘फरेबी जाल’ हा मूकपट बनवत होते. त्यात एका १० मिनिटांच्या लहानशा भूमिकेसाठी एका शालीन चेहऱ्याच्या अभिनेत्रीच्या शोधात ते होते. शालूताईंनी दुर्गाबाईंचे नाव पुढे केले. दुर्गाबाईंसमोर अर्थार्जन हाच महत्त्वाचा प्रश्न होता. त्यांनी लगेच होकार दिला. दुर्गाबाईंची भूमिका लहानशीच होती, ती त्यांनी पूर्ण केली. चित्रपटाच्या इतर पटकथेबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. मात्र चित्रपटाची जाहिरात करताना वाडिया यांनी ‘सुप्रसिद्ध लाड घराण्याची मुलगी आणि खोटे घराण्याची सून प्रथमच चित्रपटात दिसेल’, अशी जाहिरात केली.
त्यातच हा चित्रपट अतिशय सामान्य कथानकाचा होता. प्रेक्षकांना चित्रपटातील अनेक विषय आक्षेपार्ह वाटले. कुलीन स्त्रियांनी अशा प्रकारच्या चित्रपटात काम करावे यावरून अनेकांनी असंतोष व्यक्त केला. या सर्व प्रकरणात कारण नसताना दुर्गाबाईंची नालस्ती झाली. दुर्गाबाईंचे इंग्रजी शिकवणीचे खाजगी वर्ग बंद पडले. खोटे कुटुंबाचा रोष त्यांना पत्करावा लागला. मात्र आई-वडिलांनी दुर्गाबाईंना समजून घेतले.