"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
१९६० मध्ये ‘मुघल-ए-आझम’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा दुर्गाबाई ५५ वर्षांच्या होत्या. एखाद्या कलाकाराने अशा यशाच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टीतून निवृत्त होऊन आपल्या संसारात निवांत जीवन जगणे पसंत केले असते. परंतु दुर्गाबाईंना त्यांचे अभिनयावरील प्रेम स्वस्थ बसू देणे शक्य नव्हते. निवृत्ती तर दूरच, त्यांनी कामाची गतीसुद्धा कमी केली नाही; उलट त्या अधिक जोमाने काम करू लागल्या. १९६१ ते १९८२ या त्यांच्या अखेरपर्यंतच्या २२ वर्षांत त्यांनी ९०हून अधिक चित्रपटांत काम केले. १९७४ मध्ये ‘बिदाई’ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचे उत्कृष्ट सह-अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाले.
या २२ वर्षांत त्यांनी अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम केले. हलक्याफुलक्या, परंतु हृदयाला भिडणाऱ्या कथानकांवर काम करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हृषिकेश मुखर्जी यांच्याबरोबर त्यांनी ‘दो दिल’, ‘अनुपमा’, ‘प्यार का सपना’, ‘आनंद’, ‘बावरची’, ‘चैताली’, ‘अभिमान’ इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले. तर गुलजार यांच्याबरोबर ‘खुशबू’ या चित्रपटात काम केले. राजकपूर दिग्दर्शित ‘बॉबी’ तसेच सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्ज’ हे चित्रपट देखील खूप गाजले. याशिवाय त्यांना दक्षिण भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक एल. व्ही. प्रसाद, मेहबूब खान आणि इतर अनेक दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
या काळात अनेक प्रसिद्ध सहकलाकारांबरोबर दुर्गाबाईंनी काम केले. काही महत्त्वाचे सहकलाकार म्हणजे मीना कुमारी, धर्मेंद्र, शशी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, सायरा बानो, हेमा मालिनी, दिलीप कुमार, देव आनंद, वैजयंतीमाला, साधना, बलराज साहनी, नंदा, संजीव कुमार, मुमताज, बिस्वजीत, जया भादुरी, रणधीर कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा.
हृषिकेश मुखर्जी
दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (हृषिदा) यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपला खोल ठसा उमटवला आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मध्यमवर्गीय कौटुंबिक कथानकावर आधारित, तसेच मनाला भिडणाऱ्या मानवी मूल्यांचे दर्शन घडवणारे चित्रपट तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी दिग्दर्शन केलेले चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत अजरामर झाले आहेत. स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात मातृतुल्य आणि आदरणीय म्हणून मानल्या जाणाऱ्या स्वाभिमानी स्त्रियांच्या भूमिकांसाठी हृषिदांनी दुर्गाबाईंना पसंत केले. दोघांमधील हे सहकार्य तब्बल सोळा वर्षे टिकले आणि किमान सात चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केले. हा केवळ योगायोग नव्हता, तर परस्परांच्या कलागुणांवरील विश्वास होता.
हृषिदा आपल्या चित्रपटांसाठी वास्तववादी आणि आपलेसे वाटणारी पात्रे निर्माण करीत असत, तर दुर्गाबाई एक स्वतंत्र कलावंत म्हणून त्यात आत्मीयतेने अभिनय सादर करत असत. विशेषतः ‘आई’च्या भूमिकांमध्ये त्यांची संवेदनशीलता आणि शिस्त यांचे सुंदर मिश्रण दिसत असे. हृषिदांच्या कथानकातील भावुकता आणि दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील उबदारपणा आणि सौजन्य यामुळे पडद्यावरची नाती खरीखुरी भासत. दुर्गाबाईंची हृषिदांनी केलेली निवड ही केवळ भूमिकेसाठी योग्य कलाकार म्हणून झाली नव्हती, तर ती हृषिदांच्या दिग्दर्शनशैलीशी सुसंगत असलेल्या दुर्गाबाईंच्या कलागुणांमुळे झाली होती.
१९५७ मध्ये ‘मुसाफिर’ हा हृषिदांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. एका घरात राहणाऱ्या तीन कुटुंबांच्या परस्परसंबंधांवर आधारित ही कथा होती. या चित्रपटात दुर्गाबाईंनी ‘निलांबर शर्मा’ ही व्यक्तिरेखा साकारली. हृषिदांच्या दिग्दर्शन कारकिर्दीच्या सुरुवातीलाच झालेल्या या सहकार्यातून दोघांमध्ये परस्पर विश्वास निर्माण झाला. त्यातूनच पुढील अनेक वर्षे त्यांनी सातत्याने एकत्र काम केले. या चित्रपटाला १९५७चा ‘सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट’ हा भारत सरकारचा पुरस्कार मिळाला.
१९६६ मध्ये, म्हणजे ‘मुसाफिर’नंतर नऊ वर्षांनी, हृषिदा आणि दुर्गाबाई पुन्हा एकदा ‘अनुपमा’ या चित्रपटात एकत्र आले. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा-लेखन हृषिदांनी केले. चित्रपटात दुर्गाबाईंनी नायकाच्या (धर्मेंद्र) आईची भूमिका साकारली. आईच्या भूमिकेला अपेक्षेप्रमाणे दुर्गाबाईंनी पूर्ण न्याय दिला. चित्रपटाला समीक्षकांनी आणि वृत्तपत्रांनी उचलून धरले. या चित्रपटाला १९६६ सालचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दुर्गाबाईंच्या व्यावसायिक कारकिर्दीला या चित्रपटाने चांगली गती मिळाली.
१९६५ मध्ये ‘दो दिल’ आणि त्यानंतर १९६९ साली ‘प्यार का सपना’ या हृषिदांच्या चित्रपटांत देखील दुर्गाबाईंनी काम केले. दो दिल मध्ये रानी माँ तर प्यारेका सपना चित्रपटात दुर्गाबाईंनी सुधाच्या (माला सिन्हा) आईची भूमिका साकारली.
१९७१ मध्ये ‘आनंद’ हा हृषिदांचा सर्वाधिक गाजलेला आणि स्मरणीय चित्रपट प्रदर्शित झाला. त्या काळातील दोन सुपरस्टार — राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन — यांच्या भूमिकांसाठी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. या चित्रपटाला ‘फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट’ पुरस्कारही मिळाला. या मानाच्या निर्मितीत दुर्गाबाईंनी रेणूच्या आईची भूमिका ‘अतिथी कलाकार’ म्हणून साकारली. अतिशय लहान भूमिका असूनही दुर्गाबाईंनी ही भूमिका करावी, असा हृषिदांचा आग्रह होता आणि दुर्गाबाईंनी तो आनंदाने मान्य केला.
१९७२ साली प्रदर्शित झालेला ‘बावर्ची’ हा हिंदी संगीतप्रधान विनोदी नाट्यचित्रपट हृषिदांनी दिग्दर्शित केला. कथा तपन सिन्हा यांच्या एका बंगाली चित्रपटावर आधारित होती. बावर्चीने त्या काळात मोठे व्यावसायिक यश मिळवले. या चित्रपटात दुर्गाबाईंची भूमिका रामनाथ शर्मा (ए. के. हंगल) यांची पत्नी आणि मीता हिची आई अशी होती. दुर्गाबाईंची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.
बावर्ची नंतर १९७३ साली हृषिदा आणि दुर्गाबाई पुन्हा एकत्र आले ‘अभिमान’ या चित्रपटात. यात त्या काळातील लोकप्रिय जोडी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात दुर्गाबाईंनी ‘दुर्गा मावशी’ — नायकाची (अमिताभ बच्चन) मावशी — ही भूमिका साकारली. त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धातील ही भूमिका विशेष प्रशंसनीय मानली जाते.
‘नमक हराम’ या हिंदी नाट्यचित्रपटात दुर्गा खोटे यांनी ‘सोमूची आई’ (राजेश खन्ना) ही भूमिका साकारली. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात त्या काळातील दोन मोठे स्टार — राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन — पुन्हा एकदा प्रमुख भूमिकांत होते. कथानक दोन मित्रांवर आधारित आहे. एक मित्र आपल्या मित्राच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कारखान्यातील कामगार संघटनेत शिरतो आणि कामगारांच्या सुखदुःखात मिसळतो. सामाजिक आशय असलेल्या हृषिदांच्या या चित्रपटात आईच्या भूमिकेत पुन्हा एकदा दुर्गाबाईंनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.
इतर गाजलेले चित्रपट
१९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘खिलौना’ या चित्रपटात दुर्गाबाईंनी ‘ठकुराईन’ ही भूमिका साकारली. एल. व्ही. प्रसाद निर्मित या चित्रपटात संजीव कुमार, मुमताज, जितेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. या चित्रपटातील दुर्गाबाईंची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
१९७३ मध्ये राज कपूर निर्मित ‘बॉबी’ या चित्रपटात दुर्गाबाईंनी ऋषी कपूरची लहानपणीची दाई आणि नायिका डिम्पल हिच्या आजीची भूमिका साकारली. या चित्रपटातून ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी प्रथमच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला. दुर्गाबाईंच्या विशेष गाजलेल्या भूमिकांपैकी ही एक होती. नव्या पिढीतील नायक-नायिकांसोबतही त्यांनी आपली भूमिका तितक्याच प्रभावीपणे साकारली.
१९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘खुशबू’ या चित्रपटात दुर्गाबाईंनी ‘वृंदावनची आई’ ही भूमिका साकारली. गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात जितेंद्र आणि हेमा मालिनी प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट एका बंगाली चित्रपटावर आधारित होता. गुलजार यांच्यासारख्या प्रथितयश दिग्दर्शकाबरोबर काम करून त्यांनी आपले अभिनयकौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले.
१९८० साली प्रदर्शित झालेल्या ‘कर्ज’ या चित्रपटात दुर्गाबाईंनी नायक रवि वर्माची (राज किरण / ऋषी कपूर) आई ही भूमिका साकारली. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात ऋषी कपूर आणि टीना मुनीम प्रमुख भूमिकेत होते. कथानक पुनर्जन्म आणि सूड या विषयांभोवती फिरते. चित्रीकरणाच्या काळात आजारी असतानाही त्यांनी व्यावसायिक शिस्त पाळत शूटिंग केल्याची नोंद आहे.
१९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दौलत के दुश्मन’ या चित्रपटात दुर्गाबाईंनी ‘सुनीलची आई’ ही भूमिका साकारली. या चित्रपटात विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा प्रमुख भूमिकेत होते. हा दुर्गाबाईंचा अंतिम चित्रपट होता. याही चित्रपटात आईची भूमिका साकारत त्यांनी आपल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ चाललेल्या दीर्घ आणि समृद्ध कारकिर्दीचा शेवट केला.
विविध पिढ्या, कालखंड आणि अनेक प्रकारच्या भारतीय चित्रपटांची त्यांची ही वाटचाल त्यांच्या अभिनय शैलीची साक्ष देते.
चित्रपट जगातील अनुभव आणि नाती
चित्रपट कलाकारांबद्दल आणि त्यांच्या नात्यांबद्दल सामान्य लोकांना खूप उत्सुकता असते. पडद्यावर नाती यांत्रिक आणि तंत्राचा वापर करून साकारलेली असतात. पडद्यावर प्रेमळ दिसणारे कलाकार चित्रण संपल्यावर वेगळे वागतात. प्रत्यक्षात चित्रपट कलाकारांचे जीवन अतिशय अस्थिर आणि अनिश्चित असते. स्पर्धा आणि व्यावसायिक चढाओढ यामुळे मैत्री आणि प्रेमासाठी वेळ मिळत नाही. परंतु काही ओळखी घट्ट मैत्रीत बदलतात. दुर्गाबाईंच्या जीवनात त्यांना असे काही मित्र मिळाले त्यात पृथ्वीराज कपूर, मुबारक आणि अल्तेकर यांचा त्या आवर्जून उल्लेख करतात.
पृथ्वीराज कपूर यांनी दुर्गाबाईंना बहीण मानले होते आणि राखी बांधून हे नाते घट्ट केले होते. ते त्यांना ‘डिंपल्स’ म्हणत असत. त्यांची पहिली भेट कलकत्त्यामध्ये ‘राजराणी मीरा’ च्या शूटिंगदरम्यान झाली. त्यांनी एकत्र सात चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी ‘मुघल-ए-आझम’ सर्वात जास्त गाजला. चित्रणाशिवायही पृथ्वीराज दुर्गाबाईंना अनेकदा भेटत. वृद्धापकाळाने आजारी असताना पृथ्वीराज कपूर यांनी ‘डिंप्स, देव तुझे भले करो’ असा निरोपाचा संदेश दिला होता. दुर्गाबाईंनी पृथ्वीराज कपूर यांनी ‘माझी लाडकी बहीण’ असे संबोधलेले एक मराठी पत्र जपून ठेवले होते.
कलकत्त्याहून परत आल्यावर त्यांची जयराज यांच्याशी सहकलाकार म्हणून भेट झाली. कलकत्त्याला जाण्यापूर्वी त्या नवशिक्या असताना त्यांनी जयराज यांच्याबरोबर एका चित्रपटात काम केले होते. जयराज हे अतिशय मनमिळाऊ, मेहनती आणि उद्योगी कलाकार होते. त्यांना कॅमेरा अँगल आणि लाइटिंगबद्दल बरीच माहिती होती. ते दुर्गाबाईंच्या चित्रणाची तयारी करताना विशेष काळजी घेत असत. त्यांनी एकत्र फक्त दोन चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यांची मैत्री कायम टिकून राहिली. दुर्गाबाईंची मुले देखील त्यांच्याबरोबर आवडीने वेळ घालवत.
मुबारक हे मूकपटांच्या काळापासूनचे दुर्गाबाईंचे जुने मित्र होते. नटराज फिल्म्सच्या अवघड काळात मुबारक यांनी दुर्गाबाईंना खूप मदत केली. त्यांनी नटराज फिल्म्सची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि दुर्गाबाईंना मुक्त केले. आर्थिक समस्या आल्या तेव्हा त्यांनी स्वतःचे पैसे गुंतवून चित्रपट पूर्ण केला. नटराज फिल्म्स नंतरही मुबारक यांनी दुर्गाबाईंना चांगल्या भूमिका मिळवून दिल्या. मुबारक यांची तब्येत ठीक नसताना देखील ते अधूनमधून दुर्गाबाईंना भेटायला येत असत.
वागले की दुनिया
१९८३ मध्ये वयाच्या ७८व्या वर्षी दुर्गाबाईंनी शेवटचा चित्रपट केला. परंतु त्यांचा करमणुकीच्या माध्यमाशी असलेला संबंध थांबला नाही. ‘दुर्गा खोटे प्रॉडक्शन्स’ या संस्थेमार्फत त्यांनी लघुपट, जाहिरातींचे चित्रपट आणि माहितीपट अशा विविध प्रकारच्या निर्मितीच्या क्षेत्रात काम चालू ठेवले. या काळात दूरदर्शनचा विस्तार जोमाने सुरू होता. ही वाढ ओळखून त्यांनी दूरदर्शन क्षेत्रात पदार्पण केले.
या काळातील त्यांची एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे ‘वागळे की दुनिया’ या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेची निर्मिती. १९८८ ते १९९० या काळात ‘डीडी नॅशनल’वर प्रसारित झालेली ही मालिका सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ या व्यक्तिरेखेवर आधारित होती. भारतीय मध्यमवर्गीयांच्या जीवनातील विविध समस्या हलक्या-फुलक्या पण अर्थपूर्ण पद्धतीने मांडणारी ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. या मालिकेमुळे ‘दुर्गा खोटे प्रॉडक्शन्स’ला त्या काळात खूप प्रसिद्धी मिळाली.
दुर्गाबाईंसाठी हा केवळ निवृत्तीनंतरचा छंद नव्हता, तर ठरवून टाकलेले व्यावसायिक पाऊल होते. १९८० च्या दशकातील दूरदर्शनचा विस्तार आणि भारतीय मनोरंजन क्षेत्रातील बदल त्यांनी वेळीच ओळखले. ‘वागळे की दुनिया’सारखे लोकप्रिय आणि परिणामकारक कार्यक्रम निर्माण करून त्यांनी चित्रपटसृष्टीच्या पलीकडे आपला प्रभाव कायम ठेवला.