"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
‘मी दुर्गा खोटे’ या आपल्या आत्मचरित्रातील ‘मागे वळून पाहताना’ या शेवटच्या प्रकरणात दुर्गा खोटे यांनी जीवनाबद्दल अतिशय मार्मिक विचार व्यक्त केले आहेत. दुर्गाबाईंना चित्रपटसृष्टीत भरपूर यश लाभले, तरीही कौटुंबिक जीवनात त्यांना अनेक क्लेशकारक परिस्थितींना तोंड द्यावे लागले. जीवनाच्या अखेरीस आपल्या आयुष्याची गोळाबेरीज करताना दुर्गाबाई म्हणतात,
“माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली, तर शिल्लक ‘समाधान’ असेच येते”
त्याकाळी स्त्रिया चित्रपटात काम करत नसत. परंतु परिस्थितीने दुर्गाबाईंना चित्रपटाकडे ओढले. तरीही समोर आलेल्या परिस्थितीला त्यांनी एक वरदानच मानले. त्या म्हणतात,
“जर परिस्थितीने मला चित्रपटांत ढकललं नसतं आणि खोटे कुटुंबाच्या नशिबात उतार आला नसता, तर मी काय केलं असतं? मग माझी ओळख फक्त एका नामवंत कुटुंबातील सून एवढीच राहिली असती. ते नक्कीच फारसं सुखदायक ठरलं नसतं.”
दुर्गाबाईंचे आयुष्य बरंचसे एकाच दिशेने गेले. पन्नास वर्षांच्या त्यांच्या चित्रसृष्टीतील कारकिर्दीत त्यांना नातेसंबंध जपण्यासाठी फारसा वेळच मिळाला नाही. घर, कौटुंबिक जीवन, नातेवाईक, मित्र, शाळेतील सोबती, हे सगळे त्यांच्या आयुष्यातून निघून गेले. चित्रपटांचे शूटिंग आणि निर्मिती व्यवसाय हे दोन्ही करत राहणे त्यांना आवश्यक होते. त्यांनी आपलं आयुष्य आपल्या कामाभोवती उभं केलं. शूटिंगच्या तारखांनीच त्यांचा दिनक्रम ठरवला. आयुष्याच्या अखेरीस याची काहीशी खंत त्यांना जरूर वाटते. त्या म्हणतात,
“नाती जपावी लागतात, त्यांच्यासोबत सुख-दुःख वाटावं लागतं. ते मात्र मी कधी करू शकले नाही. मग, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या लोकांनी त्यांच्या आयुष्याचं चक्र माझ्याभोवती फिरवावं, अशी अपेक्षा ठेवणं योग्य ठरेल का? लोकांनी माझ्यासाठी वेळ काढावा, माझा विचार करावा, मला आपुलकी दाखवावी, अशी मी अपेक्षा का ठेवावी?”
त्यांच्या पिढीतील, विशेषतः सधन घराण्यांतील स्त्रियांवर असलेल्या बंधनांबाबत दुर्गाबाई खेद व्यक्त करतात. त्या म्हणतात,
“माझ्या पिढीतील, विशेषतः सधन आणि शिकलेल्या घरांतील, मुलींना, कधीच उपयुक्त कौशल्य शिकवलं जात नव्हतं. आम्हाला संगीत, शिवणकाम किंवा चित्रकला शिकवली जायची, पण ती फक्त छंद म्हणून—शाळा-कॉलेज संपल्यावर मोकळ्या वेळात करण्यासाठी. शाळेनंतर कॉलेजात जायचं, तेही फक्त लग्न होईपर्यंतचा वेळ घालवण्यासाठी. लग्न झालं की गृहिणी होणं, हाच मुलींसाठी आखून ठेवलेला मार्ग. आयुष्य सुखद होईल की दु:खद, ते नशिबावर अवलंबून.”
दुर्गाबाईंना चित्रपटांच्या झगमगाटाचं आकर्षण नव्हतं. ग्लॅमर ही एक बाह्य आणि क्षणभंगुर गोष्ट आहे, असं त्या मानत. मुळात अभिनयक्षेत्रातील त्यांचा प्रवेश हा ग्लॅमरसाठी नव्हताच. या क्षेत्रात वावरताना, पुरुष सहकलाकारांसमवेत काम करताना त्यांच्याविषयी कधी आकर्षण वाटते का, या प्रश्नाला दुर्गाबाईंना अनेकदा सामोरे जावे लागले. अभिनयातील ताणतणाव आणि कामातील व्यस्ततेमुळे कलाकारांना वैयक्तिक जीवनात भावना व्यक्त करण्यासाठी जागाच उरत नाही, असे त्या म्हणतात. दुर्गाबाईंनी आपल्या आयुष्यात वेळ पाळण्याला अतिशय महत्त्व दिले. आपल्या शूटिंगसाठी त्या वेळेचं काटेकोरपणे पालन करत, किंबहुना वक्तशीर म्हणून त्यांची ख्याती होती. परंतु इतर अनेक कलाकार आणि सहकारी कधीच वेळेवर येत नसत. त्यामुळे त्यांना दिवसातले अनेक तास वाया घालवावे लागत. चित्रपटसृष्टीत वेळेला महत्त्व नसल्याचा खेद व्यक्त करताना त्या म्हणतात,
“आज स्टुडिओत वेळेचं बंधन उरलेलं नाही. घड्याळं फक्त शोभेची वस्तू झाली आहे. वेळेवर पोहोचण्याला काही अर्थ उरलेला नाही. उलट उशिरा पोचणं हे प्रतिष्ठेचं प्रतीक झालं आहे.”
अर्थात चित्रपटसृष्टीमधील होणारे काही बदल त्यांना आशादायक वाटतात. त्या म्हणतात,
“आम्ही मात्र खूप काही शिकलो—पाय घसरले, पडलो, पुन्हा उठलो, पुन्हा वाट काढली. पण आमच्या बर्याच समस्या आज तंत्रज्ञानाने सोडवल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटसृष्टीला आज मान्यता मिळाली आहे. चित्रपट निर्मिती आणि अभिनय शिकवणाऱ्या अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. सिनेमाला शैक्षणिक दर्जा मिळाला आहे. कलाकारांनी या सोयी, हा सन्मान जपणं आपलं कर्तव्य मानलं पाहिजे. झगमगाटामागे धावण्याऐवजी चित्रपटकला, चित्रपटव्यवसाय आणि स्वतःला घडवण्यात लक्ष घातलं तर ते सर्वांसाठीच फायदेशीर ठरेल. आज चित्रपटसृष्टीत महिलांनाही महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.”
आयुष्याची गोळाबेरीज करतांना त्या समाधान व्यक्त करतात. त्याचबरोबर आई या नात्याने मुलांना त्या पुरेसा वेळ देऊ शकल्या नाहीत याची खंत व्यक्त करतात. त्या म्हणतात,
“आज, शहात्तराव्या वर्षी मागे वळून पाहते तेव्हा वाटतं, माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. केवळ देवाची कृपा होती म्हणून मी त्या पार करू शकले. मुलं आणि त्यांचं कल्याण हीच माझी कायमची चिंता होती. आज ती सर्व स्वावलंबी आणि आनंदी आहेत यातच मला समाधान आहे. कामाच्या व्यापात त्यांना पुरेसा वेळ देऊ शकले नाही हे दुःख मात्र एक आई म्हणून माझ्या मनात कायम शिल्लक आहे. कदाचित त्या वेदना माझ्याबरोबरच संपतील.”