"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
‘फरेबी जाल’ या चित्रपटात दुर्गाबाईंनी काम केले खरे, परंतु तो चित्रपटसृष्टीत अनवधानाने झालेला प्रवेश होता. त्यांना चित्रपटसृष्टीची विशेष माहिती नव्हती. सुरुवातीच्या काळात चित्रपटांमध्ये स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करत असत. त्यानंतर काही स्त्रिया चित्रपटांत दिसू लागल्या, मात्र उच्चभ्रू कुटुंबातील स्त्रिया चित्रपटात काम करत नसत. चित्रपटसृष्टीचा पहिला अनुभव अतिशय वाईट असला तरी दुर्गाबाईंना तिचे आकर्षण निर्माण झाले.
१९१० ते १९३० हा काळ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. या काळात भारतीय चित्रपटसृष्टी एक सांस्कृतिक आणि औद्योगिक शक्ती म्हणून उदयास येत होती. हा काळ प्रामुख्याने मूकपटांचा होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सर्वप्रथम एच. एस. भाटवडेकर यांनी मुंबईमध्ये, हिरालाल सेन यांनी कलकत्त्यामध्ये आणि जमशेदजी मदन यांनी मद्रासमध्ये लघुचित्रित चित्रपटांची निर्मिती केली होती.
मात्र दादासाहेब फाळके यांना ‘भारतीय सिनेमाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी या उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतात चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने फाळके लंडनला गेले. तेथे त्यांनी चित्रपट निर्मितीची उपकरणे खरेदी केली आणि आवश्यक उत्पादन प्रक्रिया शिकून घेतल्या. परत आल्यावर, १९१३ मध्ये दादासाहेब फाळके दिग्दर्शित आणि निर्मित पहिला पूर्णवेळ भारतीय मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाला. राजा हरिश्चंद्रच्या निर्मितीच्या काळात महिला व्यावसायिक चित्रपटांत काम करत नसत. त्यामुळे या चित्रपटातील स्त्री भूमिकेसाठी एका तरुण मुलाची निवड करण्यात आली होती.
याआधी, १९१२ मध्ये दादासाहेब तोरणे यांचा ‘श्री पुंडलिक’ हा मूकपट प्रदर्शित झाला होता. मात्र श्री पुंडलिक हे एक चित्रित नाटक होते. त्यात ब्रिटिश कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता आणि त्याची प्रक्रिया लंडनमध्ये पार पडली होती. फाळकेंच्या चित्रपटात मात्र चित्रण आणि प्रक्रिया भारतातच करण्यात आली. त्यामुळे पहिल्या भारतीय चित्रपटाचे श्रेय दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र याला मिळाले.
राजा हरिश्चंद्र चित्रपटाच्या यशानंतर भारतीय चित्रपट सृष्टीच्या विकासात मुंबई, कलकत्ता आणि मद्रास ही प्रमुख केंद्रे म्हणून उदयास आली. मुंबई चित्रविश्वात कोल्हापूरचेही महत्त्वाचे योगदान होते.
आर. नटराजा मुदलियार यांनी १९१५ मध्ये ‘गोपाल कृष्ण’ हा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट तयार केला, तर रघुपती नायडू यांना तेलुगू सिनेमाचे जनक मानले जाते. बाबूराव पेंटर यांनी १९१९ मध्ये कोल्हापूर येथे ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली. सामाजिक विषयांवरील मूकपट हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. द्वारकादास संपत यांनी देखील १९१९ मध्ये ‘कोहिनूर फिल्म कंपनी’ची स्थापना केली. अर्देशिर इराणी यांनी १९२० मध्ये ‘स्टार फिल्म कंपनी’ / ‘इंपिरियल फिल्म्स’ सुरू केली. १९३१ मध्ये त्यांनी ‘आलम आरा’ हा भारताचा पहिला बोलपट दिग्दर्शित करून प्रसिद्धी मिळवली. १९२५ मध्ये ‘शारदा फिल्म कंपनी’ स्थापन झाली. स्टण्ट चित्रपटाची संकल्पना शारदा फिल्म कंपनीने भारतात आणली.
बाबुराव पेंटर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फिल्म कंपनीतून काही महत्त्वाचे कलाकार बाहेर पडले. विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर, सीताराम कुळकर्णी आणि व्ही शांताराम अशा पाच भागीदारांनी १९२९ मध्ये ‘प्रभात फिल्म कंपनी’ची (कोल्हापूर) स्थापना केली.
याशिवाय, ‘रणजित मूव्हिटोन’ (१९२९, मुंबई), ‘ब्रिटिश डोमिनियन फिल्म्स स्टुडिओ’ आणि ‘अरोरा फिल्म कॉर्पोरेशन’ (१९२९, कोलकाता), ‘जनरल पिक्चर्स कॉर्पोरेशन’ (१९२९, मद्रास) आणि ‘ओरिएंटल फिल्म कंपनी’ (१९१९) यांसारख्या कंपन्यांनीही या काळात महत्त्वपूर्ण योगदान दिले.