"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
कलकत्त्यातील चित्रपटांचे काम संपल्यानंतर दुर्गाबाईंनी केवळ मुंबई आणि आसपासच्या परिसरातच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कलकत्ता आणि लाहोरहून आलेले प्रस्ताव नाकारले. त्यांच्या या निर्णयामागे महत्त्वाचे कारण होते—त्यांचा परिवार. बकुल आता दहा वर्षांचा झाला होता, तर हरिन सात वर्षांचा. दोन्ही मुले कॅथेड्रल बॉईज स्कूलमध्ये शिकत होती. मुले आजी-आजोबांकडे राहत असत. त्यांना स्वतःचे घर हवे होते, स्थिर कौटुंबिक जीवनाची गरज होती. दुर्गाबाईंनाही सततच्या धावपळीचा कंटाळा आला होता आणि त्यांनाही आपल्या मुलांबरोबर राहण्याची आणि कुटुंबासाठी स्थैर्य आणण्याची इच्छा होती.
दुर्गाबाईंच्या या निर्णयामुळे विशेषतः मुलांना खूप आनंद झाला. दुर्गाबाईंनी डोंगरसी रोडवर एका मोठ्या बंगल्याचा काही भाग भाड्याने घेतला. नवीन घरात प्रशस्त खोल्या होत्या. सर्व खोल्या एका रुंद व्हरांड्यात उघडत होत्या. पंचवीस लोकांना जेवण घालण्याइतका मोठा तो व्हरांडा होता. त्यांनी घर सुंदर सजवले, घरात मुलांना जेवणासाठी चांदीची ताटे, नवीन फर्निचर घेतले. बंगल्याला एक लहान बाग होती. बागेत फळझाडे होती. विश्वनाथ यांचा दम्याचा त्रास बळावला होता. त्यांना येण्याजाण्यासाठी दुर्गाबाईंनी एक मॉरिस गाडी घेऊन दिली. मुलांसाठी देखील शाळेत येण्या-जाण्यासाठी एक गाडी घेऊन दिली. मुंबईत परत येऊन दुर्गाबाईंनी आपल्या घराची चांगली व्यवस्था लावून दिली.
नशिबाने, दुर्गाबाईंना ‘बॉम्बे स्टुडिओ’ मध्ये एका चित्रपटात काम मिळाले. कलकत्त्यामध्ये केलेल्या ‘सीता’ चित्रपटासारखाच हा एक पौराणिक चित्रपट होता. प्रभात आणि कलकत्त्याच्या तुलनेत, मुंबईतील स्टुडिओंमध्ये अभिनेत्यांना प्रशिक्षण देण्याची किंवा मार्गदर्शन करण्याची परंपरा नव्हती. त्यांना कथेची फक्त एक ढोबळ रूपरेषा दिली जाई, आणि चित्रीकरणादरम्यान अनेक गोष्टी जोडल्या जात असत. संवादांच्या प्रती देखील त्यांच्या हाती सेटवर आल्यावरच पडत असत. दुर्गाबाईंनी या कामाच्या पद्धतीशी जुळवून घेतले. आता हा त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय होता आणि त्यांना मिळालेल्या कोणत्याही भूमिकेला न्याय देणे आवश्यक आहे, असा त्यांनी निर्धार केला. जरी सर्व भूमिका एकाच साच्यात बसत असल्या तरी, त्या प्रत्येक वेळी थोड्या वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा दुर्गाबाई प्रयत्न करत. त्यातून त्यांनी लवकरच त्यांच्या भूमिकांवर स्वतःचा वैयक्तिक ठसा उमटवला.
दुर्गाबाई एखाद्या नव्या चांगल्या कामाच्या शोधात असतानाच त्यांच्या समोर मोठी संधी चालून आली. प्रभातचे व्ही. शांताराम यांनी ‘अमरज्योती’ या त्यांच्या नव्या चित्रपटासाठी दुर्गाबाईंना विचारणा केली आणि त्यांनी लगेचच आपला होकार कळवला. प्रभातने पुण्यात आपला मोठा स्टुडिओ बांधला होता. ‘अमरज्योती’चे चित्रण तेथेच होणार होते. चित्रणासाठी पुण्याला जाणे भाग होते. आई पुन्हा आपल्यापासून दूर जाणार यामुळे मुले हिरमुसली झाली. परंतु मुंबई–पुणे अंतर जास्त नसल्याने आणि त्या शनिवार–रविवार मुंबईला येतील असे सांगून दुर्गाबाईंनी मुलांची समजूत काढली आणि नव्या कामासाठी पुण्याला प्रयाण केले.
‘अमरज्योती’ या चित्रपटावर काम सुरू झाले. व्ही. शांताराम स्वतः दिग्दर्शन करत होते. चित्रपटाची मांडणी अतिशय सुरेख पद्धतीने करण्यात आली. संगीताची बाजू मास्टर कृष्णराव यांच्यावर सोपवण्यात आली. ‘सौदामिनी’ या नायिकेच्या भूमिकेत दुर्गाबाई काम करत होत्या. शांता आपटे आणि वासंती यांना सौदामिनीच्या अनुयायिनींच्या भूमिका दिल्या गेल्या. कलाकारांच्या वेशभूषा इत्यादींमध्ये फत्तेलाल जातीने लक्ष घालत होते.
१९३६ मध्ये ‘अमरज्योती’ पूर्ण झाला आणि मुंबईत प्रदर्शित झाला. या चित्रपटातील व्ही. शांताराम यांचे दिग्दर्शन, मास्टर कृष्णराव यांचे संगीत आणि दुर्गाबाईंचा अभिनय अतिशय गाजले. समीक्षकांनी दुर्गाबाईंच्या सफाईदार आणि उत्कृष्ट अभिनयाचा विशेष गौरव केला. ‘अमरज्योती’ पाहिल्यानंतर प्रेक्षक भारावून जात. ‘अमरज्योती’ चित्रपट व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय फिल्मोत्सवासाठी पाठवण्यात आला. तिथे त्याला चांगली मान्यता मिळाली आणि प्रशस्तिपत्रही प्रदान करण्यात आले. भारतातही अमरज्योतीला अनेक मान्यवर संस्थांकडून सुवर्णपदके मिळाली.
प्रभातकडून अमरज्योतीच्या निर्मितीसाठी खूप कष्ट घेण्यात आले होते आणि त्यांना अपेक्षित यश मिळाले. दुर्गाबाईंनाही त्या यशाचा फायदा झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना मुंबईतील चित्रपटांमध्ये अनेक भूमिकांचे प्रस्ताव आले.
१९३६ मध्येच दुर्गाबाई कोल्हापूरला, महाराजकुमारी अक्कासाहेब यांच्या मालकीच्या ‘शालिनी स्टुडिओ’मध्ये काम करण्यासाठी गेल्या. तिथे ‘उषास्वप्न’ आणि ‘सावकारी पाश’ हे दोन चित्रपट त्यांनी केले. तिसरी पटकथा ‘प्रतिभा’ खास दुर्गाबाईंसाठी लिहिली गेली होती. हे तिन्ही चित्रपट बाबुराव पेंटर यांनी दिग्दर्शित केले. राजाराम महाराजांनी दुर्गाबाईंच्या राहण्याची व्यवस्था राजवाड्यात केली. त्या दर शुक्रवारी मुंबईला जात आणि सोमवारी परत येत असत. स्टुडिओने ही अट मान्य केली होती. मुलेही अधूनमधून काही दिवसांसाठी कोल्हापूरला येत असत. विश्वनाथ देखील एकदा कोल्हापूरला आले. महाराज आणि अक्कासाहेब त्यांच्याशी अतिशय आपुलकीने वागले. मुलांना कोल्हापूर खूप आवडले आणि त्यांना राजेशाही जीवन मोहक वाटले.
शालिनी स्टुडिओमधील कामही राजेशाही थाटात आणि राजघराण्याच्या लहरीनुसार चालत असे. दिग्दर्शक बाबुराव पेंटर आपला बहुतेक वेळ चित्रकलेत घालवत असत. चित्रीकरणाचा वेग खूप मंद होता. उषास्वप्न आणि सावकारी पाशसाठी आलटून-पालटून चित्रीकरण केले जात असे, तर ‘प्रतिभा’चा सेट क्वचितच लावला जात असे. दुर्गाबाईंनी कामाच्या धीम्या गतीबाबत बाबुराव पेंटर यांचे लक्ष वेधले, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दुर्गाबाईंना काहीही न करता बसून राहणे आवडत नसे. अखेरीस १९३७ मध्ये प्रतिभा आणि इतर दोन चित्रपट पूर्ण झाले, पण ते फारसे चालले नाहीत.
याच सुमारास मुंबईतील काही लोकांनी दुर्गाबाईंना चित्रपट निर्मिती व्यवसायात उतरण्याचा सल्ला दिला. दुर्गाबाई एकतीस वर्षांच्या झाल्या होत्या. त्यांनी आठ चित्रपटांमध्ये काम केले होते, त्यामुळे चित्रपट व्यवसायात त्यांचे नाव आदराने घेतले जाऊ लागले होते. याचा फायदा घेऊन काही ठोस पावले उचलावीत असे त्यांना वाटू लागले. त्याच सुमारास याबाबतचा एक प्रस्ताव त्यांच्या समोर आला.
नटवरलाल हे एक प्रतिष्ठित सॉलिसिटर होते. त्यांचे जयपूरमधील एक स्नेही ‘असोसिएटेड प्रॉडक्शन’ या नावाची संस्था स्थापन करून चित्रपटसृष्टीमध्ये मुद्दल गुंतवण्यास तयार होते. नटवरलाल, दुर्गाबाई आणि इतर काही व्यक्ती एकत्र येऊन ‘नटराज प्रॉडक्शन’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली. ‘असोसिएटेड प्रॉडक्शन’ भांडवल गुंतवेल आणि ‘नटराज प्रॉडक्शन’ चित्रपट निर्मिती करेल असे ठरले. चित्रपट निर्मितीमधून झालेल्या नफ्यापैकी २५% ‘नटराज प्रॉडक्शन’कडे राहील, तर उर्वरित नफा ‘असोसिएटेड प्रॉडक्शन’कडे जाईल. मात्र तोटा झाल्यास तो ‘नटराज प्रॉडक्शन’ला सहन करावा लागणार नाही, असेही ठरले. दुर्गाबाईंना इतर निर्मात्यांबरोबर काम करण्याची मुभा असेल. प्रस्तावात तोट्याचा धोका नसल्याने दुर्गाबाईंनी हा प्रस्ताव मंजूर केला. १९३७ मध्ये नटराज प्रॉडक्शनची औपचारिक स्थापना झाली.
करार झाला आणि मोठ्या उत्साहाने कामाला सुरुवात झाली. ‘सवंगडी’ हा चित्रपट काढण्याचे ठरले. मामा वारेंनी कथा लिहिली आणि पंडित आनंदकुमार यांनी तिला ‘साथी’ या नावाने हिंदीमध्ये रूपांतरित केले. चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात करण्याचे ठरले. केशवराव धायबर यांनी प्रभात सोडले होते आणि ‘जयश्री फिल्म्स’ नावाची स्वतःची निर्मिती कंपनी स्थापन केली होती. त्यांना बरोबर घेण्याचे ठरले. सर्वानुमते दुर्गाबाईंनी यशोदेची भूमिका करावी, असे ठरले. साथी या चित्रपटाशिवाय कंपनीने ‘नंदकुमार’ हा चित्रपट देखील हातात घेतला. या चित्रपटात देखील दुर्गाबाईंची भूमिका होती. त्याकाळात दुर्गाबाई इतर निर्मात्यांचेही काम स्वीकारतच होते.
दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण ठीक सुरू झाले. परंतु त्यादरम्यान काही अनपेक्षित घटना घडल्या. असोसिएटेड प्रॉडक्शन्सचे गुंतवणूक-भागीदार जयपूरमध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. या घटनेने नटराज कंपनीच्या पायालाच धक्का बसला. चित्रपट व्यवसाय स्वतःच्या आर्थिक बळावर पुढे नेण्याची क्षमता नटवरलाल यांच्यात नव्हती. अशातच दुर्गाबाई आणि त्यांच्या मुलांना मलेरिया झाला. काही काळ चित्रीकरण थांबवावे लागले. नटराज प्रॉडक्शनने १९३८ मध्ये दोन्ही चित्रपट मोठ्या हिमतीने पूर्ण केले आणि नटराज प्रॉडक्शन बंद करून दुर्गाबाई मुंबईला परतल्या.