"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
‘फरेबी जाल’ या चित्रपटाच्या अप्रिय अनुभवानंतर दुर्गाबाईंनी मनोमन चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. जरी अजून प्रयत्न करावेत असे त्यांना वाटत होते, तरी सासर किंवा माहेरून कोणतेही प्रोत्साहन मिळणार नाही, याची त्यांना पूर्ण खात्री होती. मात्र, त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते.
१९२९ मध्ये व्ही. शांताराम आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’मधून बाहेर पडून कोल्हापूरमध्ये ‘प्रभात फिल्म कंपनी’ची स्थापना केली. पहिल्या दोन वर्षांत प्रभातने सहा मूकपट प्रदर्शित करून चित्रपटसृष्टीत खळबळ उडवली. १९३१ मध्ये प्रभातने आपला पहिला मराठी बोलपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि या चित्रपटासाठी नायिकेच्या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याच्या शोधाला सुरुवात झाली.
शांताराम बापूंनी ‘फरेबी जाल’ चित्रपट पाहिला आणि पहिल्या दहा मिनिटांतील दुर्गाबाईंचे काम त्यांना आवडले; मात्र उर्वरित चित्रपटाबद्दल ते अत्यंत नाराज झाले. सभ्य घरातील सुशिक्षित महिलांना अशा चित्रपटांमध्ये काम करण्यास प्रवृत्त केले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र तिरस्कार व्यक्त केला.
प्रभातचे संगीतकार गोविंदराव टेंबे पूर्वी गंधर्व नाटक कंपनीत काम करत होते आणि तेव्हापासून ते दुर्गाबाईंच्या वडिलांना ओळखत होते. शांताराम बापू आणि गोविंदराव टेंबे मुंबईत आले असता त्यांनी दुर्गाबाईंना भेटून आपल्या चित्रपटात काम करण्याचा प्रस्ताव मांडला. घरून यासाठी परवानगी मिळणार नाही याची दुर्गाबाईंना पूर्ण कल्पना होती. तरीदेखील, शांताराम बापूंच्या शब्दाला मान देत, “विचार करून सांगते,” असे म्हणून त्यांनी तो प्रस्ताव उघडपणे नाकारला नाही.
दुर्गाबाईंनी बराच विचार केला. घर चालवण्यासाठी त्यांना अर्थार्जन महत्त्वाचे होते. अशी संधी नाकारणे त्यांना व्यावहारिक वाटले नाही. त्यांनी आपल्या वडिलांसमोर हा विषय काढला. वडिलांनी प्रथमदर्शनी त्याला स्पष्ट नकार दिला; परंतु दुर्गाबाई हट्ट सोडेनात, तेव्हा ते म्हणाले,
“मी स्वतः शांताराम बापूंशी बोलेन. माझ्या अटी त्यांना मान्य असतील तरच तू हा प्रस्ताव स्वीकार.”
दुसऱ्या दिवशीच दुर्गाबाईंनी शांताराम बापू आणि गोविंदराव टेंबे यांची वडिलांशी भेट घडवून आणली. वडिलांनी शांताराम बापूंसमोर एक लांबलचक यादी ठेवली. चित्रपटाच्या कथेत आणि चित्रीकरणात स्त्रियांचा आदर कसा राखला जाईल, यावर त्यात प्रामुख्याने भर होता. शांताराम बापूंनी त्या सर्व अटी शांतपणे ऐकून घेतल्या आणि आश्वासन दिले की दुर्गाबाईंना कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे सन्मानाने वागवले जाईल. वडिलांना त्यांचे म्हणणे योग्य वाटले. वाटाघाटीनंतर प्रभातने दुर्गाबाईंबरोबर तीन महिन्यांचा करार केला. दुर्गाबाईंना तीन महिन्यांचे २२५० रुपये वेतन मान्य करण्यात आले. आणि अशा प्रकारे दुर्गाबाईंच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाची सुरुवात झाली.
कोल्हापूरला जाण्याची तयारी तातडीने सुरू झाली. दोन्ही मुलांना आई-वडिलांकडे ठेवण्याचा निर्णय दुर्गाबाईंनी घेतला. विश्वनाथने तीन महिन्यांची सुट्टी घेऊन कोल्हापूरला बरोबर येण्याचा आग्रह धरला. दोघे रेल्वेने कोल्हापूरला पोहोचले. प्रभातच्या मालकांनी त्यांच्यासाठी एक सुंदर बंगला भाड्याने घेतला होता. स्टुडिओ जवळ असूनही ये-जा करण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. चित्रीकरणाचे काम सुरू झाले. चित्रपटाचे नाव ठरले – ‘अयोध्येचा राजा’.
दुर्गाबाईंच्या बोलण्यात इंग्रजीचा प्रभाव जाणवत होता. शांताराम बापूंच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यामुळे त्यांनी अट घातली की कोल्हापूरमधील तीन महिन्यांच्या वास्तव्यात दुर्गाबाईंनी एकही इंग्रजी शब्द बोलायचा नाही. यामागचा उद्देश त्यांची मराठी आणि हिंदी भाषा शुद्ध करणे आणि उच्चार स्पष्ट करणे हा होता. दुर्गाबाईंच्या मराठीवरही गोव्याच्या कोकणी भाषेचा प्रभाव होता. त्यामुळे मराठी उच्चार सुधारणे आणि हिंदी भाषा आत्मसात करणे ही दुर्गाबाईंसाठी प्रथम गरज होती.
शांताराम बापू स्वतः शिस्तप्रिय दिग्दर्शक होते. त्यांनी दुर्गाबाईंच्या चालण्यावर, बोलण्यावर, हावभावांवर आणि कॅमेऱ्यासमोरच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आणि योग्य त्या सूचना देऊन हवा तसा परिणाम चित्रपटात उतरवला. अभिनय नैसर्गिक पण प्रभावी कसा असावा, भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे आणि त्या पडद्यावर आकर्षकपणे कशा साकाराव्यात हेही शांताराम बापूंनी त्यांना शिकवले.
साहेबमामा फत्तेलाल वेशभूषा आणि दागिने विभागाची जबाबदारी सांभाळत. ते कलाकारांचे अनेक फोटो काढून त्यावर वेशभूषा आणि दागिन्यांचे रंग भरून मगच अंतिम निर्णय घेत. व्यक्तीचे शरीर, चेहऱ्याचा आकार आणि भूमिका या सर्व बाबी विचारात घेऊन ते वेशभूषा ठरवत. चित्रपटातील कॅमेराचे व्यवस्थापन धायबर यांच्याकडे होते. व्यक्ती आणि तिचा चेहरा कोणत्या कोनातून सर्वाधिक उठून दिसतो, कोणती केशरचना अधिक आकर्षक भासते, तसेच अभिनयातील उणिवा कशा लपवता येतील, याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.
दामले मामांकडे रेकॉर्डिंग विभागाची जबाबदारी होती. त्यांनी दुर्गाबाईंना आपला आवाज कसा नियंत्रित करावा हे शिकवले आणि भावनिक दृश्यांमध्ये तो कर्कश वाटू नये याकडे विशेष लक्ष दिले. गोविंदराव टेंबे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली. दुर्गाबाईंना संगीताची आवड असली तरी त्या प्रशिक्षित गायिका नव्हत्या. तरीदेखील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाबाईंचे गाणे समाधानकारक झाले.
चित्रणाच्या काळात दुर्गाबाई दिवसाचे सुमारे बारा तास कामात व्यस्त असत. त्या काळी कोल्हापूरमध्ये वीज नसल्यामुळे सर्व चित्रीकरण नैसर्गिक प्रकाशात करावे लागत असे. सकाळी साडेसात वाजता चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी मेकअप, वेशभूषा आणि केशरचना पूर्ण करावी लागत असे. सूर्यास्त होईपर्यंत चित्रीकरण सुरू राही.दुपारी जेवणासाठी केवळ एक तासाची विश्रांती काय ती मिळे.
मेकअप काढल्यानंतर संवाद आणि गाण्यांची तालीम, तसेच दुसऱ्या दिवसाच्या दृश्यांचे कथन पूर्ण होईपर्यंत त्यांना घरी पोहोचायला संध्याकाळचे सात वाजत. त्यानंतर त्या वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत आणि थकवा घालवण्यासाठी मसाज घेत. रात्री नऊ वाजता जेवण झाल्यावर त्या पूर्णपणे थकून जात असत.
कामात व्यस्त असूनही त्यांना कोल्हापूर आणि आसपासची सुंदर ठिकाणे पाहण्याची संधी मिळाली. अंबाबाई देवीचे दर्शन त्यांना नेहमीच आनंद देई. प्रभातने त्यांची अतिशय उत्कृष्ट सोय केली होती. प्रभातचे मालकच नव्हे तर त्यांचे कुटुंब आणि कंपनीचे कर्मचारी यांनीही त्यांना आदर आणि प्रेमाने वागवले. त्यांच्या जेवणाची, आरोग्याची आणि इतर सर्व गरजांची काळजी घेतली जात होती. काही काळ दुर्गाबाईंची मुले, बकुल आणि हरिन, कोल्हापूरला आई-वडिलांना भेटायला आली. त्यांचेही सर्वांनी खूप लाड केले.
दुर्गाबाई कोल्हापूरमधील तीन महिन्यांच्या वास्तव्यात अत्यंत समाधानी होत्या. लग्नानंतर हा त्यांच्या आयुष्यातील पहिला खरा आनंदाचा काळ होता. मुंबईला परतल्यावर वडील, आई आणि मुलांना भेटून त्यांना भावना आवरल्या नाहीत. पुढील अनेक दिवस मुलांनीही त्यांची पाठ सोडली नाही.
१९३२ मध्ये अयोध्येचा राजा हा चित्रपट मुंबईतील मॅजेस्टिक सिनेमामध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. दोन्ही चित्रपट गाजले. त्याची मराठी आवृत्ती तर प्रचंड लोकप्रिय झाली. प्रभात चित्रपटातील वास्तववादी सेट, चित्रीकरणाच्या जागा, भव्य राजवाडे, खरी जंगले, खऱ्या नद्या आणि अप्रतिम चित्रण पाहून प्रेक्षक रोमांचित आणि आश्चर्यचकित झाले. दुर्गाबाईंनी साकारलेली तारामतीची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. तारामतीच्या भूमिकेमुळे दुर्गाबाईंना चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळाले. मात्र, तारामती आणि अयोध्येचा राजा यांच्या यशाचे श्रेय दुर्गाबाईंनी प्रभातच्या मालकांना तसेच त्यात सहभागी कलाकार आणि तंत्रज्ञांना दिले.
अयोध्याचा राजा हा चित्रपट मुंबईत चालू असताना, दुर्गाबाईंना एक मजेशीर अनुभव आला. त्या आणि त्यांच्या आई खरेदीसाठी गाडी थांबवून उभ्या होत्या, आणि दोघींत काहीसा संवाद सुरू होता. तेवढ्यात दोन मुलांचे संभाषण त्यांच्या कानावर आले.
एक म्हणाला, “अरे, हा तर तारामतीचा आवाज आहे!”
दुसरा म्हणाला, “ये, बघूया!”
दोघे पायाच्या बोटांवर उभे राहून गाडीत डोकावले. मग एकमेकांकडे पाहून उद्गारले, “ही तारामती नाही. ही तर सावळी आहे. तारामती किती गोरी आहे.”
या छोट्याशा प्रसंगातून, लोक चित्रपट कलाकारांच्या ओळखीबाबत किती वरवरचे आणि भ्रामक आकलन करतात, हे दुर्गाबाईंना प्रकर्षाने जाणवले.
लाड कुटुंबीयांनी दुर्गाबाईंचे खूप कौतुक केले. वडिलांनी तर अनेक दिवस रोज रात्री तिकीट काढून चित्रपट पाहिला. प्रभातने दुर्गाबाईंना दिलेले मानधन वडिलांनी तिकिटांच्या स्वरूपात पुन्हा प्रभातला परत केले, असे गमतीने त्यांचे मित्र त्यांना चिडवत. मात्र, आपल्या मनाविरुद्ध चित्रपटात काम केल्याबद्दलचा राग सासू-सासऱ्यांनी मात्र कायम ठेवला.
चित्रपटाच्या यशामुळे प्रभात पुढील चित्रपट देईल अशी त्यांना अपेक्षा होती. पण योग्य भूमिका नसल्याने त्यांना पुढच्या चित्रपटात घेतले नाही, याचे दुर्गाबाईंना वाईट वाटले. मात्र फार काळ न थांबता १९३२ मध्येच प्रभातने ‘माया मच्छिन्द्र’साठी त्यांना बोलावले. ‘माया मच्छिन्द्र’ चित्रपटात दुर्गाबाईंना ‘राणी किलोताला’ची भूमिका मिळाली. ही भूमिका तारामातीच्या भूमिकेपेक्षा पूर्ण भिन्न होती. स्त्रियांच्या राजवटीवर आधारित या चित्रपटासाठी त्यांना तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी आणि युद्धकलेचे प्रशिक्षण घ्यावे लागणार होते. त्यांनी बकुल आणि हरिनला आईकडे सोपवले, पती विश्वनाथ त्यांच्या आई-वडिलांकडे राहायला गेले आणि दुर्गाबाई कोल्हापूरला गेल्या.
‘माया मच्छिंद्र’चे चित्रीकरण सुरू झाले. दुर्गाबाई कामात मग्न झाल्या. प्रभातने नेहमीप्रमाणे आपली कार्यव्यवस्था पणाला लावली. वसंतोत्सवाचे चित्रीकरण सुरू असताना, महाराणी आणि छत्रपती राजाराम महाराजांची बहीण राजकुमारी अक्कासाहेब आपल्या कुटुंबासह चित्रीकरण पाहण्यासाठी आल्या. दुर्गाबाईंची या दोघींशी ओळख करून देण्यात आली. नंतर, कोणामार्फत तरी त्यांनी दुर्गाबाईंना राजवाड्याला भेट देण्यासाठी आमंत्रण पाठवले. महाराज प्रभातसारखी चित्रपट निर्मिती कंपनी सुरू करण्यास उत्सुक होते, हे सर्वश्रुत होते. मात्र चित्रपट निर्मितीच्या व्यावसायिक गुंतागुंतीत अडकण्याची त्यांची इच्छा नव्हती. दुर्गाबाईंनी राजवाड्याला भेट देणे टाळले.
१९३२ मध्ये माया मछिंद्र चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला. माया मच्छिंद्र मधील गाणी, नृत्य, भव्य सेट, वेशभूषा, दागिने आणि नेत्रदीपक दृश्यांमुळे चित्रपट अविस्मरणीय ठरला. विशेष आकर्षण म्हणजे राणी किलोतालाची पाळीव चित्तीण ‘सुंदरी’! ही चित्तीण तिच्या पायाशी बसून राजबिंड्या चेहऱ्याने इकडेतिकडे पाहत असे. हे दृश्य प्रेक्षकांना विशेष भावले. माया मच्छिंद्रच्या मराठी आणि हिंदी या दोन्ही आवृत्त्यांमधून प्रभातला चांगला नफा झाला. त्यानंतर प्रभातचा व्यवसाय झपाट्याने वाढला आणि त्यांनी कोल्हापूरहून पुण्यातील विस्तीर्ण प्रभातनगर येथे आपला तळ हलवला. माया मच्छिंद्रमुळे दुर्गाबाईंचे हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान बळकट झाले.