"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
दुर्गा खोटे, पूर्वाश्रमीच्या विठा लाड (बानू), यांचा जन्म वडील पांडुरंगराव लाड आणि आई मंजुळाबाई यांच्या पोटी १४ जानेवारी १९०५ रोजी मुंबई येथे झाला. पांडुरंगराव आणि मंजुळाबाई यांना तीन मुली होत्या – शालू, इंदू आणि सर्वात लहान विठा. परंतु विठाचे नाव पुढे ‘बानू’ असे पडले. तीन मुलींनंतर नवस बोलून त्यांना एकुलता एक मुलगा झाला, त्याचे नाव मनोहर. लाड घराणे मूळचे गोव्याचे, परंतु, मुंबईमध्ये स्थायिक झालेले एक सधन आणि आधुनिक कुटुंब. पांडुरंगरावांचे वडील शामराव नारायणराव लाड, पांडुरंगराव आणि त्यांचे कुटुंब, पांडुरंगरावांचे तीन भाऊ आणि त्यांची कुटुंबे तसेच, पांडुरंगरावांच्या चुलतभावाची विधवा पत्नी अशा सर्वांसह हे एक मोठे संयुक्त कुटुंब होते. घरात मुख्यतः कोकणी भाषा बोलली जात असे.
बानूचे आजोबा शामराव नारायण लाड अनेक वर्षे गुजरातमधील खंबायत संस्थानात दिवाण म्हणून काम करत. शामराव शरीराने दणकट आणि स्वभावाने कणखर. खंबायतमध्ये असताना शामराव यांच्या वर खुनाचा प्रयत्न झाला. त्यात त्यांच्या नाकावर गंभीर जखम झाली. त्यावेळी त्यांनी ऍनेस्थेशिया न घेता डॉक्टरांकडून जखमेवर टाके घालून घेतले होते. पुढे शामरावांचे खंबायत संस्थानाशी संबंध बिघडले. ते खंबायतहून परत आले आणि मुंबईमध्ये स्थायिक झाले. खंबायतहून येताना त्यांनी चांदी-सोने, किमती वस्तू, मखमली गालिचे, जरीकाम आणि भरतकाम केलेली वस्त्रे अशा अनेक मौल्यवान वस्तू बरोबर आणल्या. समाजात लाड कुटुंब एक श्रीमंत कुटुंब म्हणून गणले जात असे.
वडील पांडुरंगराव हे शामरावांचे दुसरे पुत्र. ते एक यशस्वी वकील होते. ते ‘खंडेराव, लाड अँड कंपनी’ नावाची वकिली करणारी कंपनी चालवत असत. पांडुरंगराव व्यवसायात यशस्वी तर होतेच, परंतु स्वभावाने अत्यंत प्रेमळ, बुद्धिमान, उदार आणि उदात्त विचारांचे होते. गोरगरिबांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांची जीवनशैली मात्र महागडी होती. विलायती कपडे, चायना‑सिल्कचा सूट, बोटात हिऱ्याची अंगठी, पुणेरी चपला असा त्यांचा श्रीमंती थाट होता. मराठी नाटकांची त्यांना विशेष आवड होती. एल्फिन्स्टन थिएटरमध्ये गंधर्व नाटक कंपनीची नाटके ते आवर्जून पाहात असत. कंपनीच्या नाट्यप्रयोगाला नाशिक‑पुण्याला देखील जात असत. बानू आणि इतर मुलांना देखील नाटकांना नेत असत. गणपतराव बोडसांनी गंधर्व कंपनी सोडल्यावर कंपनीची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यावेळी पांडुरंगरावांनी त्यांना खूप मदत केली.
बानूची आई मंजुळाबाई या मूळच्या सुखठणकर या सधन कुटुंबातल्या. त्या केवळ बारा वर्षांच्या असताना त्यांचे पांडुरंगरावांशी लग्न झाले. त्या वयातही मंजुळाबाईंना अस्खलित इंग्रजी बोलता येत होते. घोडेस्वारी आणि पोहणेही अवगत होते. वडिलांनी त्यांना ख्रिश्चन मिशनरी शाळेत घातले होते. त्यामुळे त्यांची राहणी पूर्णपणे पाश्चिमात्य पद्धतीची होती. पांडुरंगराव आणि मंजुळाबाई यांचा प्रेमविवाह झाला होता. पांडुरंगरावांचे हे दुसरे लग्न होते. मंजुळाबाईंपेक्षा ते बरेच मोठे होते. पांडुरंगरावांनी एकदा मंजुळाबाईंना घोडेस्वारी करताना पाहिले आणि ते त्यांच्या प्रेमात पडले. दोन्ही घरांतून संमती झाली आणि दोघांचे लग्न थाटामाटात पार पडले. मंजुळाबाईंचे अर्धवट राहिलेले शिक्षण लग्नानंतरच पूर्ण झाले. पांडुरंगरावांनी मंजुळाबाईंना आयुष्यभर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला.
लाड घराण्यातील एकत्र कुटुंबात मुलांचे संगोपन आणि घरातील दैनंदिन जीवन यात स्त्रियांचा वाटा जास्त होता. आई, विधवा चुलत काकी आणि इतर तीन काक्या आणि आत्या यांचा बानूच्या जडणघडणीत मोठा वाटा होता. चुलत काकीचे नाव गुलाबबाई उर्फ काकीबाई. काकीबाई या लाड कुटुंबाच्या सर्वेसर्वा होत्या. स्थूल, गोऱ्या आणि कायम हसतमुख असणाऱ्या काकीबाई कमी शिकलेल्या असूनही घराचा कारभार त्या समर्थपणे सांभाळत. घरातील महत्त्वाचे निर्णय त्यांच्या सल्ल्याने घेतले जात. कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या त्या आनंदाने आणि सहजपणे पार पाडत असत. सर्वात मोठी काकी उंच, सावळी, मात्र कुरकुऱ्या स्वभावाची होती. घरातील कामाला त्यांचा हातभार कमीच होता. मधली काकी गोरी, सुंदर आणि हुशार होती. घरात तिला चांगलेच वजन होते. धाकटी काकी गोरी, सडपातळ, परंतु गर्विष्ठ स्वभावाची होती. घरातील आणखी एक स्त्री म्हणजे बानूची आत्या अक्कुबाई. घरातील एकुलती एक मुलगी असल्यामुळे अक्कुबाईला भरपूर मान होता. मात्र बानू आणि तिच्या बहिणींविषयी तिला फारशी आस्था नव्हती. अक्कुबाई आणि मंजुळाबाईंचे देखील फारसे पटत नसे.
पांडुरंगराव व्यवसायात व्यस्त असूनही त्यांनी कधीही मंजुळाबाई, मुले किंवा कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. पत्नी मंजुळाबाई, तीन मुली शालू, इंदू आणि बानू आणि मुलगा मनोहर हेच त्यांचे संपूर्ण जग होते. ते मुलांचे भरपूर लाड करत आणि त्यांना भरभरून प्रेम देत असत. पांडुरंगराव आणि मंजुळाबाई यांच्यातील नाते अत्यंत प्रेमळ आणि एकमेकांना पूरक होते. पांडुरंगराव मंजुळाबाईंच्या मतांना अतिशय महत्त्व देत असत. दैनंदिन जीवनातल्या घटना ते मंजुळाबाईंना सांगत असत आणि मंजुळाबाई त्या गोष्टींमध्ये उत्सुकतेने सहभागी होत असत. दोघांमधील नाते परस्पर आदर आणि प्रेमाने गुंफलेले होते.
बानूला वडिलांकडून कलाप्रेमाचा वारसा मिळाला. कलांबद्दलचा आदर आणि आत्मीयता पांडुरंगरावांच्या अंगीच रुजलेली होती. त्यांनीच बानूला बालपणापासूनच रंगभूमीची आवड लावली, तिला अनेक मराठी नाटके दाखवली, त्याचबरोबर गुजराती आणि उर्दू नाटकेही दाखवली. बानूने पहिले नाटक वयाच्या पाचव्या वर्षी पाहिले. ते होते ‘संगीत मानापमान’. त्यानंतर बानूने ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘द्रौपदी’, ‘सौभद्र’, ‘मृच्छकटिक’ ही नाटके अनेक वेळा पाहिली. त्याशिवाय ‘मूकनायक’, ‘शापसंभ्रम’, ‘शाकुंतल’, ‘शारदा’ यांसारखी नाटके देखील तिला पाहायला मिळाली. नाटकातील संगीत, नेपथ्य आणि वेशभूषा तिच्या डोळ्यासमोर कायम राहायची. नाटकातील विनोदी प्रसंगांवर ती खळखळून हसायची आणि दुःखाच्या प्रसंगांवर मनमोकळेपणाने रडून नाटकाशी समरस व्हायची. बालगंधर्वांशी बानूच्या वडिलांची ओळख होती. बानूला अनेक वेळा त्यांचा सहवास लाभला. तिला बालगंधर्वांबद्दल विशेष आदर होता.
मंजुळाबाई जेव्हा वाळकेश्वर मधील त्यांच्या शिक्षित आणि आधुनिक वातावरणातून लाड कुटुंबात आल्या, तेव्हा त्या आपली मूल्ये बरोबर घेऊन आल्या. त्यांनी आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने वाढवून प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा निश्चय केला. त्यांचे मुलांच्या अभ्यासावर विशेष लक्ष होते. त्यांनी मुलांना प्राचीन संस्कृतीच्या परंपरा आणि चालीरीती शिकवल्या तसेच आधुनिक शिक्षणही दिले. मुलांना नृत्य, गायन आणि टेनिससारखे खेळ शिकवले. मंजुळाबाईंना शेक्सपियर, टेनीसन आणि वर्डस्वर्थ यांच्या कविता मुखोद्गत होत्या तसेच, गीतेतील श्लोक, संत रामदास, व्यंकटेश आणि शिवाच्या स्तोत्रांचाही त्यांचा अभ्यास होता. मुलेही सर्व धार्मिक विधी आणि सण यांमध्ये सहभागी होत असत.
मंजुळाबाई पाश्चिमात्य जीवनशैलीने प्रभावित होत्या. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये त्यांची उठबस असे. त्या गव्हर्नरच्या निवासस्थानी होणाऱ्या कार्यक्रमांना नियमितपणे उपस्थित राहत. सामाजिक कार्यातही त्यांना विशेष रस होता. त्या रेड क्रॉस सोसायटी आणि महिला परिषदेसाठीही काम करत. मुले उच्चशिक्षित होऊन नागरी सेवा किंवा तत्सम उच्च पदांवर पोहोचावीत यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. मनोहरला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनवण्याची त्यांची इच्छा होती.
बानूचे आईच्या माहेरी, म्हणजे सुखठणकर कुटुंबातही येणेजाणे होते. सुखठणकर कुटुंबाचे घर अतिशय शांत पण निरस होते. वाळकेश्वरमधील त्यांच्या आलिशान घरात ढकलीबाई सुखठणकर (बाई) आणि त्यांचा धाकटा मुलगा भालचंद्र (भालू) राहत होते. बाई अत्यंत श्रीमंत असूनही दुःखी होत्या. त्यांना माहेर आणि सासरकडून प्रचंड संपत्ती मिळाली होती; परंतु या संपत्तीमुळे नातेवाईकांकडून त्यांना सतत त्रास सहन करावा लागत असे. होता. त्यांच्या आयुष्यातील एकमेव आनंद म्हणजे त्यांची मुलगी, म्हणजेच बानूची आई. बाईंचा मोठा मुलगा गुलाब सोळा वर्षांचा असताना शिक्षणासाठी इंग्लंडला गेला आणि बाई जिवंत असताना कधीही परतला नाही. याचे त्यांना खूप दुःख होत असे. भालू बुद्धिमान पण हट्टी आणि चिडखोर होता. बाईंनी प्रसिद्ध संगीतकार विष्णू नारायण भातखंडे (अण्णा) यांना आसरा दिला होता. अण्णांच्या संगीत कार्यात बाईंनी बराच खर्च केला. अण्णांच्या वास्तव्याने घरात संगीताचे वातावरण होते.
बानूच्या बालपणीच कलाप्रेम, सुसंस्कृत वर्तन आणि निष्ठावान मूल्यांची बीजे रोवली गेली. लहानपणी एकत्र कुटुंब पद्धतीत राहिल्यामुळे बानूला प्रेम, नाती, हितसंबंध, कुटुंबाबद्दलची आस्था आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव झाली. वडिलांचे कलाप्रेम बानूला कलाक्षेत्राशी जिव्हाळा निर्माण करून देणारे ठरले. आईचे आधुनिक शिक्षण, इंग्रजी भाषा आणि संस्कार यांनी तिच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुसंस्कृतपणा, व्यावहारिक दृष्टिकोन आणि वक्तशीरतेची मूलभूत तत्त्वे रुजवली.