"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
१९८३ हे वर्ष दुर्गाबाईंच्या जीवनात त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीच्या परिपूर्तीचे ठरले. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारद्वारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार व्यक्तींना ‘भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी केलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी’ प्रदान केला जातो.
१९८३ मध्ये ३१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी दुर्गाबाईंची निवड ही त्यांच्या अतुलनीय कारकिर्दीची पावती होती. या आधीही भारत सरकारने १९६८ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
१९३२ मध्ये ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या बोलपटापासून त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. एका प्रतिष्ठित आणि सुशिक्षित कुटुंबातील महिलेने चित्रपटसृष्टीत प्रवेश करून समाजात एक नवा पायंडा घातला. त्यानंतर ५० वर्षांपेक्षा जास्त काळ सुमारे २०० चित्रपटांत काम करून त्यांनी चित्रपटसृष्टीत स्त्रियांसाठी एक आदर्श निर्माण केला. कारकिर्दीच्या या सर्वोच्च टप्प्यानंतरही त्या टेलिव्हिजनवरील ‘वागले की दुनिया’ या आपल्या मालिकेद्वारे सतत सक्रिय राहिल्या.
१९८२ मध्ये दुर्गाबाईंनी ‘मी, दुर्गा खोटे’ या नावाने मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिले. या आत्मचरित्रात आपल्या व्यावसायिक जीवनाची वाटचाल आणि कौटुंबिक जबाबदारी तसेच त्याची परिपूर्ती यावर त्यांनी विस्तृत प्रकाश टाकला. त्यांच्या मरणोत्तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने आत्मचरित्राचे ‘I, Durga Khote’ हे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले. शांता गोखले यांनी केलेले हे भाषांतर मूळ मराठीतील भाव आणि बारकावे उत्तमरीत्या जपणारे आहे.
मानवी जीवन हे सुख-दुःख, यश-अपयश आणि विविध अनुभवांचे मिश्रण असते. ‘मागे वळून पाहताना’ या मथळ्याखाली लिहिताना दुर्गाबाईंनी आपल्या आयुष्याचा प्रामाणिक आणि अंतर्मुख करणारा आढावा घेतला आहे. “तुम्ही आयुष्यात आनंदी होतात का?” या प्रश्नाला त्यांनी दिलेले उत्तर खूप काही सांगून जाते— “मी दुःखी नव्हते... आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते.”
दुर्गाबाईंच्या स्नुषा विजया मेहता या स्वतः एक नामांकित रंगमंच आणि टेलिव्हिजन दिग्दर्शिका बनल्या. त्यांना नाटक अकादमी अवॉर्ड आणि इतर अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले. दुर्गाबाईंची नातवंडे अंजली, रवी आणि देवेन खोटे यांनीही चित्रपट उद्योगात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. विशेषतः देवेन खोटे हे दूरदर्शन आणि चित्रपट निर्माता म्हणून ओळखले जातात. त्यांची पुतणी शुभा खोटे आणि पुतण्या विजू खोटे हे देखील सुप्रसिद्ध कलाकार आहेत.
त्यांच्या उत्तरायुष्यात दुर्गाबाई अलिबाग येथे स्थायिक झाल्या. २२ सप्टेंबर १९९१ रोजी मुंबईत, वयाच्या ८६व्या वर्षी, दुर्गाबाईंचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या उल्लेखनीय कारकिर्दीचा अंत झाला. ऋषिकेश मुखर्जी, तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी दुर्गाबाईंना श्रद्धांजली अर्पण केली. २००० मध्ये इंडिया टुडे मासिकाने आपल्या ‘मिलेनियम’ अंकात दुर्गाबाईंना ‘भारताला आकार देणाऱ्या १०० व्यक्तीं पैकी एक’ म्हणून घोषित केले. भारत सरकारने २०१३ मध्ये दुर्गाबाईंच्या नावाने टपाल तिकिट जारी केले.