"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
माहितीपटांची निर्मिती हा दुर्गाबाईंच्या कलात्मक आणि व्यावसायिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. रशीद आणि दुर्गाबाई युरोपच्या प्रवासाला एकत्र गेले होते. मात्र, दुर्गाबाई भारतात परतल्यानंतर रशीद यांनी तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला. काही काळानंतर ते भारतात परत आले. परत आल्यानंतर रशीद दिल्ली, मोरादाबाद, कानपूर आणि लखनौ दरम्यान ये-जा करत होते. त्यांनी अनेक व्यवसाय करण्याचे प्रयत्न केले; परंतु ते अयशस्वी ठरले.
१९५२ मध्ये एका व्यावसायिक कामानिमित्त रशीद मुंबईला आले आणि त्यांनी दुर्गाबाईंशी संपर्क साधला. दिल्लीत कार्यालय असलेल्या ‘टेक्निकल को-ऑपरेटिव्ह मिशन’ (टीसीएम) या अमेरिकन संस्थेशी त्यांनी माहितीपट तयार करण्याचा करार केला होता आणि त्यासाठी त्यांना दुर्गाबाईंच्या सहकार्याची आवश्यकता होती.
दुर्गाबाईंकडे नाटक आणि चित्रपटांमध्ये पुरेसे काम होते, त्यामुळे त्यांना रशीद यांच्या या व्यवसायासाठी वेळ देणे कठीण होते. लग्नाच्या पहिल्या दोन वर्षांनंतर त्यांचे आणि रशीद यांचे संबंध कधीच जुळले नाहीत आणि आता ते वेगळेच राहत होते. रशीद यांच्याशी असलेल्या नात्याला कायमचा विराम देण्याची दुर्गाबाईंची इच्छा होती. जर दुर्गाबाईंनी रशीद यांच्या ‘टीसीएम’च्या प्रस्तावात मदत केली, तर रशीद त्याला मान्यता द्यायला तयार होते. त्यामुळे दुर्गाबाईंनी ते काम स्वीकारले. रशीद यांनी दिल्लीतून आणलेले हे काम व्यवसायाच्या दृष्टीने चांगले होते; मात्र त्याची योग्य हाताळणी करणे महत्त्वाचे होते. याच कारणामुळे त्यांनी दुर्गाबाईंना व्यवसायात सामील करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. रशीद त्यांच्या कामात हस्तक्षेप करणार नाहीत, या अटीवरच दुर्गाबाईंनी हे काम स्वीकारले. आर्थिक व्यवहारांबाबतही त्यांनी आपल्या अटी रशीद यांच्याकडून मान्य करून घेतल्या.
माहितीपट निर्मितीसाठी ‘फॅक्ट फिल्म’ नावाची कंपनी सुरू करण्यात आली. टीसीएमने आगाऊ रक्कम देऊ केली. त्यातून दुर्गाबाईंनी सर्वप्रथम एक छानसे कार्यालय उभारले. त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांतील कामाच्या व्यापामुळे सर्व माहितीपट स्वतः चित्रित करणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रभात स्टुडिओच्या दिवसांपासून ओळख असलेले विश्वासू तंत्रज्ञ कामावर ठेवले. लवकरच त्यांनी टीसीएमचे दोन माहितीपट ठरलेल्या वेळेत पूर्ण केले. त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे टीसीएम खूप खूश झाले. या दोन माहितीपटांच्या यशानंतर टीसीएमकडे माहितीपटांच्या मागण्या येऊ लागल्या. कामाचे प्रमाण वाढत गेले तसे दुर्गाबाईंचा उत्साहही वाढत गेला.
माहितीपट बनवण्यात दुर्गाबाई पूर्णपणे रमून गेल्या. यामध्ये त्यांना चित्रपट निर्मितीचे अनेक पैलू नव्याने शिकायला मिळाले. त्या अतिशय लहान गावांमध्ये जाऊन सामान्य लोकांशी भेटत आणि त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपट तयार करीत. अनेक ठिकाणी फिरून त्यांनी मच्छीमार, विणकर, सुतार, लोहार, चांभार अशा विविध व्यावसायिकांवर चित्रपट बनवले. याचबरोबर शहरी समस्या, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या विषयांवरही त्यांनी माहितीपट तयार केले. या कामादरम्यान त्यांना देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करण्याची संधी मिळाली.
दुर्गाबाईंच्या काही माहितीपटांना प्रचंड प्रशंसा मिळाली. ‘द इव्हिनिंग न्यूज’ने ‘परित्यक्ता – द डेझर्टेड वूमन’ या चित्रपटाचे कौतुकास्पद परीक्षण प्रसिद्ध केले. दुर्गाबाईंनी दिग्दर्शन केलेला हा माहितीपट पतींनी सोडून दिलेल्या स्त्रियांवरील हृदयस्पर्शी कथा मांडणारा होता. अशीच प्रशंसा मिळालेला दुसरा माहितीपट म्हणजे ‘दीपमाला’. हा माहितीपट ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’साठी तयार करण्यात आला होता. पंडित रविशंकर यांनी हा माहितीपट पाहून त्याची संकल्पना, संगीत आणि सिनेमॅटोग्राफीबद्दल अभिनंदन करणारे पत्र दुर्गाबाईंना लिहिले.
एका माहितीपटासाठी त्यांनी ओरिसाच्या घनदाट जंगलात तब्बल २००० मैलांचा ट्रकने प्रवास केला. या माहितीपटात लोहखनिजाचे उत्खनन आणि प्रक्रिया करण्याची प्राचीन पद्धत चित्रीत केली होती. दिल्लीतील अशोकस्तंभ आणि ओरिसातील कोणार्क मंदिरातील विजयस्तंभ हे याच लोखंडापासून बनवले गेले होते आणि ते शतकानुशतके गंजले नाहीत. ही सर्व माहिती त्यांनी माहितीपटात समाविष्ट केली. लघुपट निर्मिती हा त्यांच्या चित्रपट उद्योगातील कामाचा एक आकर्षक पैलू ठरला.
जाहिरात कंपन्यांसाठी चित्रपट बनवणे माहितीपटांपेक्षा सोपे आणि अधिक फायदेशीर असल्याचे लक्षात झाल्यावर, त्यांनी माहितीपटाऐवजी जाहिरात-चित्रपटांकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. दरम्यान, टीसीएमचा चित्रपट विभाग बंद झाला आणि माहितीपट निर्मिती आणि त्याचबरोबर रशीद यांना त्यांनी निरोप दिला.
दुर्गाबाई स्वतः चित्रपट अभिनयाच्या कामात इतक्या व्यस्त होत्या की त्यांना कोणतीही व्यावसायिक जबाबदारी घ्यायची नव्हती. मात्र, काही जाहिरात संस्थांनी त्यांना निर्मितीचे काम बंद करू नये असा आग्रह धरला. फॅक्ट फिल्म्समधून बाहेर पडल्यानंतर, दुर्गाबाईंनी दुर्गा खोटे प्रॉडक्शन्स (डीकेपी) ची स्थापना केली. त्या काळात लघुपट निर्मिती करणाऱ्या कंपन्या खूपच कमी होत्या आणि या कामाचे स्वरूप समजून घेणारेही कमी होते. त्यामुळे माहितीपटांना मोठी मागणी होती. फॅक्ट फिल्म्सने अर्धवट सोडलेले चित्रपट आपल्या कंपनीद्वारे पूर्ण करण्याची संधीही होती. या सर्व परिस्थितीमुळे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले.
दुर्गाबाईंनी आपल्या दोन सुना, टीना आणि विजया यांच्याबरोबर कंपनीची स्थापना सोबत केली. आर्थिक गुंतवणूक मात्र पूर्णपणे दुर्गाबाईंचीच होती. फॅक्ट फिल्म्सने त्यांना जे पैसे देणे बाकी होते, त्याऐवजी त्यांना चित्रपट निर्मितीसाठी दोन मौल्यवान उपकरणे मिळाली — एक कॅमेरा आणि एक मोठी स्टेशन वॅगन. कंपनीला ही मालमत्ता एक पैसाही खर्च न करता मिळाली. कॅमेरा जर्मन बनावटीचा, हलका आणि अत्याधुनिक पद्धतीचा होता. मुंबईत या प्रकारचा तो एकमेव कॅमेरा होता. या गोष्टींचे मूल्य फक्त जाणकार लोकांनाच ठाऊक होते. कॅमेरामॅन त्याची जिवापेक्षा जास्त काळजी घेत असत. कंपनीची इतकी चांगली सुरुवात झाली की लवकरच त्यांना मोठ्या कार्यालयासाठी नवीन जागा घ्यावी लागली. कामाचा वाढता व्याप सांभाळण्यासाठी त्यांना मोठा कर्मचारी वर्ग नेमावा लागला. कामाच्या वाढत्या प्रमाणामुळे दुर्गा खोटे प्रॉडक्शन्सला क्षणभरही उसंत मिळत नव्हती.