"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
दुगाबाईंचा मराठी रंगभूमीवरील प्रवास हा त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील यशापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आव्हानांनी भरलेला होता. १९४५च्या सुमारास युरोपच्या तीन महिन्यांच्या सुट्टीवरून परतल्यावर चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा जोरात सुरू झाले. त्याच दरम्यान, चित्रीकरणात व्यस्त असूनही त्या नाट्यक्षेत्राकडे ओढल्या गेल्या. त्याला कारण ‘बलिदान’ नावाचा आकाशवाणीवरील एक गाजलेला कार्यक्रम, ज्यात दुर्गाबाईंचा सहभाग होता.
त्या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमुळे ‘भारतीय लोकनाट्य संघा’च्या (IPTA) काही सदस्यांनी दुगाबाईंना संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. दुगाबाईंनी सुरुवातीला विरोध केला; परंतु संस्थेने आपला आग्रह सोडला नाही आणि अखेर नाईलाजास्तव त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले.
संस्थेच्या एका बैठकीत ‘आंदोलन’ नावाचे नाटक करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यात दुगाबाईंनी काम करावे असा आग्रह धरला गेला. दुगाबाईंनी याला स्पष्ट नकार दिला. मात्र, बराच आग्रह झाल्यानंतर त्या केवळ एकाच प्रयोगासाठी तयार झाल्या. हे नाटक प्रेक्षकांना इतके आवडले की एकाऐवजी तब्बल पाच प्रयोग रंगले.
आयपीटीएसाठी केलेल्या नाटकामुळे ‘मुंबई मराठी साहित्य संघा’चे संस्थापक डॉ. अमृत भालेराव यांनी दुगाबाईंना संघाच्या निर्मितीमध्ये काम करण्याचा आग्रह धरला. संघाचा दृष्टिकोन व्यावसायिक नसून कलेचे पुनरुज्जीवन करणे हा असल्याने, दुगाबाईंनी ‘भाऊबंदकी’ आणि ‘कीचकवध’ या दोन नाटकांत काम करण्यास संमती दिली. भाऊबंदकी मध्ये दुर्गाबाईंना आनंदीबाईची भूमिका करावयाची होती.
चित्रपटांचे चित्रीकरण सांभाळून नाटकांची तयारी करणे दुगाबाईंसाठी अत्यंत कठीण होते. प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक केशवराव दाते मुंबई मराठी साहित्य संघासाठी जीव ओतून काम करत असत. आणि या दोन्ही नाटकांसाठी त्यांनी अपार परिश्रम घेतले. दिवसभर शूटिंग, रात्री १ वाजेपर्यंत नाटकाची तालीम आणि दोन भूमिकांवर पकड मिळवण्याचा अखंड प्रयत्न — असा त्या काळातील दुगाबाईंचा व्यस्त दिनक्रम होता. नाटकांची अपरिचित भाषा, लांबलचक भाषणे आणि भावनापूर्ण प्रसंगांनी भरलेल्या भूमिका निभावणे हे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान होते. दाते यांनी त्यांना वेशभूषा आणि दागिन्यांची निवड करण्याची तसेच स्वतःच्या हावभावांवर काम करण्याची मुभा दिली. यामुळे त्यांना अधिक स्वातंत्र्याने अभिनय करता येत होता.
मरीन ड्राईव्हवरील खुल्या रंगमंचावर ‘भाऊबंदकी’चा पहिला प्रयोग अविस्मरणीय ठरला. विशाल खुली जागा, प्रचंड गर्दी, कलाकारांची वर्दळ, सोन्याने नटलेली वेशभूषा, महागड्या साड्या, शाली, पगड्या आणि दागिने — सर्व काही पेशवाई थाटात सजलेले होते.
रंगमंचावर जाण्यापूर्वी दुर्गाबाईंचे पाय कापत होते; परंतु एकदा रंगमंचावर गेल्यावर त्यांना कशाचेही भान राहिले नाही. प्रेक्षकांच्या दाद आणि टाळ्यांच्या गजराने कलाकारांचा उत्साह द्विगुणित झाला. सर्व कलाकारांनी अप्रतिम अभिनय साकारला आणि नाटक रंगतदार झाले.
‘भाऊबंदकी’नंतर दुगाबाईंनी ‘कौन्तेय’, ‘पतंगाची दोरी’, ‘खडअष्टक’, ‘संशयकल्लोळ’, ‘राजमुकुट’, ‘शोभेचा पंखा’ यांसारख्या अनेक संघनिर्मित नाटकांत काम केले. प्रत्येक भूमिका वेगळी होती आणि त्या सर्व भूमिका त्यांना मनापासून आवडल्या. त्यांची रंगमंच भीती नाहीशी झाली आणि अभिनयाचा खरा आनंद त्यांना मिळू लागला.
‘वैजयंती’ या नाटकाने दुगाबाईंना एक नवा अनुभव दिला. नाटकाच्या तालमी सुरू झाल्यानंतर दिग्दर्शक केशवराव दाते यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते पुढे दिग्दर्शन करू शकले नाहीत. त्यामुळे डॉ. भालेरावांनी दुगाबाईंवर दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. दिली. नाटकाचे लेखन प्रसिद्ध नाटककार वि. वा. शिरवाडकर यांनी केले होते, त्यांनीही या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दर्शविला.
दुर्गाबाईंना हा अनुभव पूर्णपणे नवा होता. मात्र डॉ. भालेराव आणि मामा पेंडसे यांच्या मदतीने हे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अखेर नाटकाचा पहिला प्रयोग झाला. मामा पेंडसे, मास्टर दत्ताराम आणि इतर कलाकारांनी अप्रतिम अभिनय सादर केला. प्रेक्षकांनी नाटकाला उत्स्फूर्त दाद दिली. नाटकाच्या अखेरीस पडदा खाली आला आणि नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
राष्ट्रीय नाट्यमहोत्सवात ‘भाऊबंदकी’ या नाटकाचे प्रदर्शन करण्यासाठी दिल्लीहून शासनाचे बोलावणे आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या प्रयोगात काम करण्याचे दुर्गाबाईंनी साफ नाकारले. नाटक पडले तर त्यांच्या चित्रपट व्यवसायावर परिणाम होणार होता. दुर्गाबाईंच्या दृष्टीने चित्रपट सृष्टी अधिक महत्त्वाची होती. परंतु डॉ. भालेरावांनी यात काम करण्यासाठी त्यांना विनवणी केली. भालेरावांना नाही म्हणणे दुर्गाबाईंना अशक्य झाले.
दिल्लीत ‘भाऊबंदकी’च्या प्रयोगाची जय्यत तयारी सुरू झाली. नवीन वेशभूषा, दागिने आणि रंगमंच व्यवस्था तयार करण्यात आल्या. नाटकांच्या जोरदार तालिमी सुरू झाल्या.
१९५४ च्या डिसेंबर महिन्यात दिल्लीत भाऊबंदकीचा प्रयोग झाला. प्रत्यक्ष प्रयोगाच्या दिवशी हॉल प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. पंडित जवाहरलाल नेहरू, बाबू राजेंद्र प्रसाद, डॉ. एस. राधाकृष्णन, उच्च सरकारी अधिकारी, अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि दिल्लीतील मराठी भाषिक समुदाय प्रयोगासाठी उपस्थित होता. पडदा वर गेला आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. आनंदीबाईंचा रंगमंचावर प्रवेश होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्व कलाकारांनी आपले संपूर्ण कौशल्य अभिनयात ओतले होते. नाटकाच्या प्रभावी सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. ज्यांना मराठी समजत नव्हते, तेही नाटकाच्या शेवटापर्यंत खुर्च्यांना खिळून बसले होते. संपूर्ण वातावरण उत्साहाने भरलेले होते.
दुर्गाबाई आपल्या नाट्यक्षेत्रातील यशाचे श्रेय डॉ. भालेराव यांना देतात. डॉ. भालेराव यांनी त्यांचे आयुष्य साहित्य संघाच्या नाट्य शाखेला अर्पण केले होते. संघाच्या अभिनेत्री म्हणून दुर्गाबाईंनी डॉ. भालेरावांसोबत घालवलेली दहा वर्षे त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि अत्यंत प्रिय आठवणींमधील वर्षे ठरली.
दुर्गाबाईंच्या नाट्यक्षेत्रातील जीवनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे १९६१ मध्ये दिल्लीत झालेल्या ४३व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड. या संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले. दुर्गाबाईंच्या अध्यक्षतेखालील हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरले. दिल्ली या राजधानीच्या शहरात मराठी रंगभूमीची ओळख अखिल भारतीय स्तरावर झाली. या नाट्यसंमेलनाचे आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद करते. मराठी रंगभूमीला प्रोत्साहन देणे, नाट्य कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मराठी नाट्यपरंपरेचे जतन करणे हा या संमेलनाचा प्रमुख हेतू आहे. या संमेलनाची सुरुवात सर्वप्रथम १९०५ मध्ये पुणे येथे झाली. आधीच्या वर्षी ४२वे अधिवेशन बडोदा येथे वसंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.