"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
विश्वनाथ आणि वडिलांच्या एकापाठोपाठ झालेल्या मृत्यूंमुळे दुर्गाबाई खचून गेल्या होत्या. कौटुंबिक तसेच व्यावसायिक जीवनात त्यांना वडिलांचा फार मोठा आधार होता. व्यवसायातील लहानमोठ्या अडचणी आणि त्यावर घ्यायचे निर्णय त्या वडिलांच्या सल्ल्याने घेत असत. आता सर्व व्यावसायिक निर्णय त्यांनाच घ्यावे लागणार होते. चित्रपट सृष्टीतच आपले व्यावसायिक जीवन घडवायचे, याबाबत मात्र त्यांना कोणतीही शंका नव्हती. कुटुंबात अनेक घडामोडी होत होत्या. त्यातून येणाऱ्या नैराश्यावर मात करून त्यांनी स्वतःला चित्रपट सृष्टीत झोकून दिले.
१९४० ते १९६० या वीस वर्षांत त्यांनी ७५ हून अधिक चित्रपटांत काम केले. ‘पायाची दासी’, ‘भरत मिलाप’, ‘पृथ्वीवल्लभ’, ‘हम लोग’, ‘मुगल-ए-आझम’ यांसारख्या चित्रपटांतून दुर्गाबाईंना भरपूर प्रसिद्धी मिळाली. आचार्य अत्रे, सोहराब मोदी, भालजी पेंढारकर, किशोर साहू, राज परांजपे, जी. पी. सिप्पी, ऋषिकेश मुखर्जी, बिमल रॉय अशा या दिग्गज दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली. गजानन जहागीरदार, शाहू मोडक, विष्णुपंत पागनीस, पृथ्वीराज कपूर, देव आनंद, सुरय्या, मधुबाला, अशोक कुमार, गीता बाली, मीना कुमारी, बलराज साहनी, भारत भूषण, सुनील दत्त, वैजयंतीमाला, दिलीप कुमार यांसारख्या सहकलाकारांबरोबर अभिनय करण्याचा योग त्यांना आला. १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम लोग’ या चित्रपटानंतर त्या ‘आई’च्या भूमिकांसाठी ओळखल्या जाऊ लागल्या.
पायाची दासी
१९४१ मध्ये आचार्य प्र. के. अत्रे ‘पायाची दासी’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. ते स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत होते. या चित्रपटात एका तरुण वधूवर तिच्या क्रूर सासूने केलेल्या अमानुष छळाचे वास्तव चित्रित केले होते. अत्र्यांनी या सासूच्या भूमिकेसाठी दुर्गाबाईंची निवड केली. सुरुवातीला दुर्गाबाईंनी ही भूमिका स्वीकारण्यास साफ नकार दिला. परंतु अत्र्यांनी त्यांना डिवचले. ते म्हणाले, “जर तुम्ही खऱ्या कलाकार असाल, तर तुम्ही हे आव्हान स्वीकाराल.” अत्र्यांच्या बोलण्याचा योग्य तो परिणाम झाला. एक आव्हान म्हणून दुर्गाबाईंनी ही सासूची भूमिका स्वीकारली.
दुर्गाबाईंकडे एक धोबीण येत असे. या धोबिणीकडे बघून त्यांनी ही भूमिका साकारली. चित्रपटात त्यांनी जाड चांदी-पितळ्याचे दागिने घातले, केसांचा अंबाडा बांधला, तोंडात कायम पानाचा तोबरा ठेवला आणि धोबिणीच्या सतत थुंकण्याच्या सवयीची त्यांनी तंतोतंत नक्कल केली. त्यांच्या तोंडी असलेले जवळजवळ प्रत्येक वाक्य शिव्याशापांनी भरलेले असे. या चित्रपटात दुर्गाबाईंच्या मुलीची भूमिका कुसुमताई देशपांडे यांनी तर सुनेची भूमिका वनमाला यांनी साकारली. दुर्गाबाईंच्या अभिनयामुळे आणि वनमाला यांच्या सुरेल गाण्यांमुळे प्रेक्षकांना चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट मराठीमध्ये ‘पायाची दासी’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. मराठी चित्रपट देखील खूप गाजला. प्र. के. अत्रे यांच्या प्रोत्साहनामुळे घेतलेल्या या निर्णयाचे दुर्गाबाईंना उत्तम फळ मिळाले.
या भूमिकेसाठी दुर्गाबाईंना समीक्षकांकडून भरघोस प्रशंसा लाभली. त्यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही प्राप्त झाला. नायिकेच्या भूमिकेच्या चौकटीतून बाहेर पडून, वेगळ्या प्रकारची भूमिका यशस्वीपणे साकारल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.
भरत मिलाप
१९४२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भरत मिलाप’ या रामायणावर आधारित चित्रपटात दुर्गाबाईंनी राणी ‘कैकयी’ची भूमिका साकारली. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाची साक्ष देणाऱ्या काही निवडक भूमिकांपैकी ही एक म्हणता येईल. विजय भट्ट दिग्दर्शित आणि प्रकाश पिक्चर्स निर्मित या चित्रपटात रामाच्या भूमिकेत प्रेम अदीब, सीतेच्या भूमिकेत शोभना समर्थ आणि भरताच्या भूमिकेत शाहू मोडक होते. कथानकात कैकयीच्या भूमिकेस भरपूर वाव होता आणि दुर्गाबाईंनी त्याचा पुरेपूर उपयोग केला. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या भूमिकेसाठी त्यांना बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचा (BFJA) सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पौराणिक व्यक्तिरेखा वेधक पद्धतीने साकारण्याची त्यांची हातोटी या भूमिकेने पुन्हा सिद्ध केली.
पृथ्वीवल्लभ
१९४३ मध्ये ‘पृथ्वीवल्लभ’ या ऐतिहासिक चित्रपटात दुर्गाबाईंनी मृणालवतीची भूमिका साकारली. मिनर्वा मुव्हीटोन या बॅनरखाली सोहराब मोदी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. दुर्गाबाईंबरोबरच स्वतः सोहराब मोदी आणि के. एन. सिंग यांनीही अभिनय केला होता. के. एम. मुन्शी यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट धाडसी प्रसंगांनी भरलेला होता. शेवटच्या दृश्यात मृणालवती आणि पृथ्वीवल्लभ यांना हत्तीच्या पायाखाली तुडवून मृत्यूदंड देण्यात येणार असतो. चित्रीकरणाच्या वेळी दुर्गाबाई त्या प्रचंड मोठ्या प्राण्याच्या पायाखाली पडल्या होत्या. जर हत्ती थोडासा जरी विचलित झाला असता किंवा त्याने आपला पाय खाली ठेवला असता, तर ते त्यांच्या जीवावर बेतले असते. चित्रण सुखरूप पार पडल्यावर त्यांनी हत्तीचे मनोमन आभार मानले!
महारथी कर्ण
१९४४ मध्ये महारथी कर्ण या पौराणिक चित्रपटात दुर्गाबाईंनी साकारलेली कुंतीची भूमिका देखील लोकांना अतिशय आवडली. प्रभाकर पिक्चर्सच्या बॅनरखाली भालजी पेंढारकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांनी कर्णाची, तर शाहू मोडक यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर दुर्गाबाईंनी अनेक चित्रपट केले, त्यापैकी हा एक महत्त्वाचा चित्रपट. दुर्गाबाईंना पृथ्वीराज कपूर यांनी बहीण मानले होते, आणि त्यांच्याबरोबर चित्रपट करताना त्यांना नेहमीच आनंद वाटत असे. दुर्गाबाई आणि पृथ्वीराज कपूर या दोघांची कामगिरी अतिशय उत्तम झाली. प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाची भरभरून प्रशंसा केली. आपल्या प्रभावी अभिनयाची साक्ष त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली.
इंडियन एक्सप्रेसने या चित्रपटाला ‘अत्यंत विस्तृत आणि आकर्षक चरित्रचित्र’ म्हणून गौरवले आणि दुर्गाबाई आणि पृथ्वीराज कपूर यांच्या उत्कृष्ट अभिनयाचा विशेष उल्लेख केला.
हम लोग
१९५१ मध्ये ‘हम लोग’ या हिंदी सामाजिक चित्रपटात दुर्गाबाईंनी ‘आई’ची भूमिका साकारली. झिया सरहदी यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या, आणि चंदूलाल शाह यांच्या रंजीत मूव्हिटोन बॅनरखाली निर्मिती झालेल्या या चित्रपटात नूतन (पारो), बलराज साहनी (राज) आणि श्यामा (शेफाली) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या क्लेशमय संघर्षांचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले होते. ‘आई’च्या भूमिकेत दुर्गाबाईंनी साकारलेली त्यागशील स्त्री आणि त्यांच्या चेहऱ्यावरील त्यागमय भावनांनी प्रेक्षकांना भावुक केले. या चित्रपटानंतर ‘आई’ची भूमिका आणि दुर्गाबाई हे चित्रपटसृष्टीत एक समीकरण बनले.
'मुघल-ए-आझम'
चित्रपटांच्या या मालिकेत, १९६० मध्ये प्रदर्शित झालेला ‘मुघल-ए-आझम’ हा दुर्गाबाईंच्या कारकिर्दीचा अत्युच्च बिंदू होता, असे म्हणायला हरकत नाही. ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाच्या संकल्पनेतील आणि निर्मितीतील भव्यतेमुळे या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळेच स्थान मिळाले आहे.
या चित्रपटाचे काम सर्वप्रथम १९४४ मध्येच सुरू झाले होते. हा चित्रपट मुघल राजकुमारावर आधारित असल्याने, स्वाभाविकच बजेट, सेट, वेशभूषा, दागिने इत्यादी सर्व बाबी प्रचंड मोठ्या पातळीवर केल्या गेल्या. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले तेव्हा महत्त्वाच्या भूमिका नर्गिस, चंद्रमोहन, सप्रू आणि दुर्गाबाई साकारत होते. बॉम्बे टॉकीजमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. जवळपास एक चतुर्थांश चित्रपट पूर्ण झाल्यावर चित्रीकरण थांबवण्यात आले. सुमारे दोन वर्षे चित्रीकरण झाल्यानंतर प्रकल्प रद्द करण्यात आला. दहा ट्रकभर सामान अक्षरशः फेकून देण्यात आले.
चित्रपटाच्या चित्रीकरणाला १९५० च्या सुमारास पुन्हा सुरुवात झाली. जवळपास सर्व कलाकार बदलण्यात आले. जोधाबाईच्या भूमिकेसाठी दुर्गाबाईंची निवड पुन्हा करण्यात आली. यावेळी अकबराच्या भूमिकेत, चंद्रमोहन यांच्या जागी पृथ्वीराज कपूर यांची निवड झाली. पृथ्वीराज आणि दुर्गाबाई यांच्यावरचे चित्रीकरण मोठ्या उत्साहाने सुरू झाले. परंतु चित्रपटाचे चित्रीकरण फार काळ चालले नाही. सलीम आणि अनारकलीच्या मुख्य भूमिकांसाठी कोणाची निवड करावी, यावर निर्णय होत नव्हता. यात पुन्हा सुमारे एक वर्षाचा खंड पडला. शेवटी दिलीप कुमार आणि मधुबाला यांची या भूमिकांसाठी निवड झाली आणि अशा प्रकारे चित्रीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू झाली.
चित्रपटाचे चित्रीकरण हिंदी, इंग्रजी आणि तमिळ या तीन भाषांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंदी आवृत्तीसाठी उर्दू साहित्यिकांची नेमणूक करण्यात आली, तर तमिळ आवृत्तीसाठी अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांना मद्रासहून बोलावण्यात आले. इंग्रजी आवृत्तीसाठी देखील साहित्यिकांची निवड झाली. सर्व काही राजेशाही थाटात पार पडत होते. हिंदी आवृत्तीत भाषेचे तीन प्रकार कुशलतेने वापरले गेले — दरबारात उर्दू, सर्वसाधारण प्रसंगांत हिंदी आणि जोधाबाईंच्या महालात स्थानिक ब्रज बोलीचा वापर केला जात होता. बोलीभाषेचा हा सुरेख संगम अत्यंत प्रभावी ठरला. मात्र, इंग्रजी संवाद खूप कृत्रिम भासत होते, आणि तमिळ आवृत्तीतही चित्रण तितके प्रभावी होत नव्हते. दुर्गाबाईंनी स्वतःसाठी खास तमिळ शिक्षिकेची नेमणूक केली होती.
तीन भाषांसाठी संवाद लिहिले जात असताना, वेशभूषा, दागिने इत्यादी बाबींकडेही तितक्याच बारकाईने लक्ष दिले जात होते. योग्य वेशभूषा तयार करण्यासाठी दिल्लीहून शिंपी बोलावण्यात आले. दागिने बनवण्यासाठी हैदराबादहून सोनार आणि मुकुट तयार करण्यासाठी कोल्हापूरहून कारागीर आणले गेले. राजस्थानातून तलवारी, चिलखत, ढाली, भाले आणि कट्यारी मागवण्यात आल्या, तर पादत्राणे आग्रा येथून मागवली गेली. शाही वेशभूषेवर सोन्याच्या धाग्याचे काम करण्यासाठी सुरतहून भरतकाम करणाऱ्यांना बोलावण्यात आले. केसांचे टोप (विग्ज) इंग्लंडमधून मागवण्यात आले होते. डोक्याचे अचूक मोजमाप घेण्यासाठी कलाकारांना खास इंग्लंडला पाठवण्यात आले.
चित्रणासाठी भव्य सेट्स उभारले गेले आणि सहा महिने चित्रीकरण सुरू राहिले. त्यानंतर चित्रीकरण पुन्हा थांबले. बजेट अनेक पटींनी वाढले होते आणि निर्मात्याला आता खर्चावर नियंत्रण ठेवणे भाग पडत होते. मात्र दिग्दर्शक के. असिफ यांना हे सर्व आवश्यक वाटत होते. यावरून दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला. शेवटी तडजोड करून चित्रीकरण पुन्हा सुरू झाले. बरीच चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर ठरले की, एक गाणे-आणि-नृत्य दृश्य इस्टमन कलरमध्ये चित्रित केले जाईल, तर बाकीचा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पूर्ण केला जाईल. चित्रपटाची इंग्रजी आवृत्ती तयार करण्याचे काम थांबवण्यात आले. तमिळ आवृत्ती पूर्ण करून प्रदर्शितही करण्यात आली; परंतु तिला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने तिचे प्रदर्शन थांबवण्यात आले.
हिंदी मधील ‘मुगल-ए-आझम’ चित्रपट ५ ऑगस्ट १९६० रोजी प्रदर्शित झाला आणि प्रचंड गाजला. दुर्गाबाईंची जोधाबाईची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. अनेक प्रेक्षक दिवसभर तिकिटांसाठी रांगेत उभे राहायचे. हा चित्रपट भारतातील बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरला. पुढील १५ वर्षे सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून हा चित्रपट ओळखला जात होता. चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले. चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि ८ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये तीन फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत ‘मुघल-ए-आझम’ हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून नोंदला गेला.