"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
बकुलने सिनियर केंब्रिज परीक्षेत चांगले यश मिळवले. त्याने दावरच्या वाणिज्य महाविद्यालयात सचिवालयाच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. यादरम्यान दुर्गाबाईंचा अँथनी डीमेलो यांच्याशी परिचय झाला. डीमेलो हे ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’चे संस्थापक सदस्य, ग्वाल्हेरच्या महाराजांचे सल्लागार आणि अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. १९४० मध्ये त्यांनी बकुलला दिल्लीमध्ये ‘कॅलटेक्स’ या कंपनीत शिकाऊ नोकरीची संधी दिली. बकुलनेही दिल्लीला जाण्याची तयारी दर्शवली. दुर्गाबाईंनी स्वतः दिल्लीला जाऊन त्याची व्यवस्था करून दिली. त्यावेळी बकुल जेमतेम पंधरा वर्षांचा होता. दुर्गाबाई दर चार-पाच आठवड्यांनी त्याला भेटायला जात असत. बकुलच्या प्रगतीवर त्या समाधानी होत्या. बकुल दिल्लीला गेल्यावर हरिन मात्र घरी एकटा झाला. आजी आणि मामांशी न पटल्यामुळे तो अधिकाधिक बंडखोर झाला. मॅट्रिक परीक्षेतही तो कसाबसा पास झाला.
बकुलला भेटायला दिल्लीला गेले असताना दुर्गाबाईंची ओळख मोहम्मद रशीद यांच्याशी झाली. ते मुरादाबादच्या राजघराण्याशी संबंधित होते. त्यांनी युरोप आणि अमेरिकेत अनेक वर्षे घालवली होती. त्यांच्या जीवनशैलीवर पाश्चात्त्य पद्धती आणि विचारांची छाप होती. ते एअर फोर्समध्ये काम करत होते. राजे-महाराजे, सरकारी अधिकारी आणि खुद्द व्हाईसरॉय यांच्यापर्यंत त्यांची मैत्री होती. रशीद यांनी त्यांच्या पहिल्या युरोपीय पत्नीला घटस्फोट दिला होता.
त्याच मुक्कामात दुर्गाबाईंना खूप ताप आला. डॉक्टरांनी मलेरियाचे निदान केले आणि ‘संपूर्ण विश्रांती’चा सल्ला दिला. त्यावेळी रशीद त्यांना भेटायला आले. त्यानंतर ते नियमित येऊ लागले. ते नेहमी फुले-फळे घेऊन येत असत. चित्रपटसृष्टी, दुर्गाबाईंचे काम आणि त्यांचे कुटुंब याबद्दल त्यांची रशीद यांच्याशी चर्चा होऊ लागली. लवकरच दुर्गाबाईंना बरे वाटले आणि त्या मुंबईला परतल्या. रशीद यांनी दुर्गाबाईंच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली. ते स्वतः त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी आले.
दुर्गाबाई मुंबईमध्ये असताना रशीद त्यांना भेटायला मुंबईला येऊ लागले. येताना ते त्यांना भेटवस्तू आणू लागले. चार-पाच महिन्यांनंतर एकेदिवशी त्यांनी दुर्गाबाईंना लग्नासाठी मागणी घातली. दुर्गाबाईंच्या दृष्टीने त्यांच्या मुलांचे भवितव्य हेच सर्वात महत्त्वाचे होते. मात्र त्यासाठी वेळोवेळी सल्लामसलत आणि मार्गदर्शनाची आवश्यकता होती. जर लग्न ही त्या मदतीची किंमत असेल, तर त्या ती देण्यास तयार होत्या. पण चित्रपटातील काम कोणत्याही परिस्थितीत सोडायचे नव्हते. दुर्गाबाईंनी या सर्व अटी रशीद यांना सांगितल्या आणि त्यांनी त्या मान्य केल्या.
रशीद यांनी बकुलला सैन्यदलात अधिकारी म्हणून नेमणूक मिळवून दिली. त्यांनी हरिनलाही जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. जेव्हा दुर्गाबाई चित्रीकरणासाठी बाहेर असत, तेव्हाही ते हरिनच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन करत. आणि जेव्हा ते मुंबईत असत, तेव्हा ते त्याला जेवणासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जात. हरिनची रशीद यांच्याशी चांगली मैत्री जमली. या सर्व घटनांनी दुर्गाबाईंना रशीद यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. त्यांनी लग्नाला होकार दिला. यावेळी दुर्गाबाई चाळीस वर्षांच्या होत्या आणि रशीद पन्नास वर्षांच्या आसपास होते. दुर्गाबाई आणि रशीद यांचा विवाह १० ऑक्टोबर १९४३ रोजी बुलंदशहर येथे झाला. दुर्गाबाईंनी धर्म मात्र बदलला नाही. रशीद यांनी आपल्या पद्धतीने मुंबईला बदली करून घेतली. एअर फोर्सने त्यांना मोठा फ्लॅट दिला. दुर्गाबाई तेथेच राहू लागल्या.
चित्रपटांच्या निमित्ताने दुर्गाबाईंना वारंवार बाहेरगावी जावे लागे. त्या काळात रशीद हरिनची चांगली काळजी घेत. दुर्गाबाई कोल्हापूरमध्ये असताना त्यांच्या आईला हिस्टेरिया झाला. मनोहरने हरिनला घराबाहेर काढले. रशीद यांनी त्याला एअर फोर्स क्वार्टर्समध्ये ठेवले. सुट्टीत त्यांनी हरिनला मुरादाबादला त्यांच्या बहिणीकडे पाठवले. तिथे तो आनंदी होता. रशीद यांच्या ओळखीने त्याला जोगेश्वरीतील ‘इस्माईल युसूफ कॉलेज’मध्ये प्रवेश मिळाला. नंतर रशीद यांनी त्याला इंग्लंडमधील रीडिंग येथील एरोनॉटिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला.
महायुद्ध संपल्यानंतर रशीद यांची नोकरी संपली. त्यांनी अनेक व्यवसाय केले पण अयशस्वी ठरले. दुर्गाबाईंनी ‘कफपरेड’ येथे फ्लॅट घेतला, पण रशीद यांचे मित्रमंडळ आणि सततच्या पार्ट्या यांमुळे घरातली शांतता निघून गेली. वैवाहिक दुरावा वाढला. शेवटी रशीद यांना एका श्रीमंत पारशी गृहस्थाकडे नोकरी मिळाली.
दुर्गाबाई हरिनला भेटण्यासाठी रशीदसोबत इंग्लंडला गेल्या. भारताबाहेरील हा त्यांचा पहिलाच प्रवास होता. त्या खूप उत्साही होत्या. हातातील कामे लवकर पूर्ण करून आणि काही कामे दोन महिन्यांसाठी पुढे ढकलून त्यांनी आपल्या व्यवसायातून मुद्दाम वेळ काढला. हरिनबरोबर काही दिवस राहून त्यांनी इंग्लंड आणि युरोपचा प्रवास केला. या प्रवासात त्यांनी अनेक शहरे आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. इंग्लंडमध्ये लंडन, ऑक्सफर्ड, केंब्रिज, रीडिंग यांसारख्या शहरांना त्यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी फ्रान्समधील पॅरिस, इटलीतील व्हेनिस आणि रोम, चेकोस्लोव्हाकियातील प्राग, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा, झुरिच, इंटरलाकन, यूंगफ्राऊ, लूसर्न तसेच इजिप्तमधील कैरो अशा अनेक ठिकाणी फेरफटका केला. रशीद इंग्लंडमध्ये दुर्गाबाईंबरोबर होते, मात्र पुढील प्रवास दुर्गाबाईंनी एकट्याने केला. भारतात देखील त्या एकट्याच परतल्या, तर रशीद काही दिवस युरोपमध्येच थांबले.