"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
"माझ्या आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते."
दुर्गा खोटे यांनी चित्रपटसृष्टीतील दीर्घ कारकीर्दीमध्ये २००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात केवळ आपला ठसा उमटवला नाही, तर महिलांसाठी चित्रपटसृष्टीत एक नवा मार्ग प्रस्थापित केला. पूर्वाश्रमीच्या विठा लाड (बानू) असलेल्या दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी मुंबईत सधन आणि आधुनिक लाड कुटुंबात झाला. वडील पांडुरंगराव लाड आणि आई मंजुळाबाई यांच्या संस्कारांतून त्यांचे बालपण घडले. लाड कुटुंब मूळचे गोव्याचे असले तरी मुंबईत स्थायिक झाले होते.
दुर्गाबाईंचे वडील पांडुरंगराव लाड हे एक यशस्वी वकील होते. ते अत्यंत प्रेमळ, बुद्धिमान आणि उदार स्वभावाचे होते. तसेच ते मराठी नाटकांचे विशेष चाहतेही होते. लहानपणापासूनच ते दुर्गाबाईंना ‘गंधर्व नाटक कंपनी’च्या नाट्यप्रयोगांना नियमितपणे नेत असत. त्यांच्याबरोबर दुर्गाबाईंनी अनेक मराठी, गुजराती आणि उर्दू नाटके पाहिली. ‘मानापमान’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’ यांसारख्या नाटकांनी त्यांच्या बालमनावर खोलवर परिणाम केला आणि वडिलांकडून त्यांना कलाप्रेमाचा अमूल्य वारसा मिळाला.
दुर्गाबाईंच्या आई, मंजुळाबाई, या सुखठणकर कुटुंबातून आलेल्या होत्या. त्या अस्खलित इंग्रजी बोलत असत तसेच घोडेस्वारी आणि पोहणे यांसारख्या कला त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या. ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिक्षण घेतल्यामुळे त्यांची राहणी पूर्णपणे पाश्चात्त्य पद्धतीची झाली होती. मुलांना आधुनिक शिक्षण देण्यावर त्यांनी विशेष भर दिला; परंतु शेक्सपियर आणि टेनीसन यांच्या कवितांबरोबरच गीतेतील श्लोक आणि संत स्तोत्रांचा अभ्यासही करवला. दुर्गाबाईंनी मुंबईतील ‘कॅथेड्रल शाळे’त शिक्षण घेतले. गिरगावातील सुखठणकर कुटुंबातून त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली आणि शाळा सोडण्याची इच्छा झाली. वडिलांच्या सल्ल्याने त्यांनी महिनाभर नेत्यांशी चर्चा केली, परंतु ठोस योजना नसल्याचे जाणून शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
१९२३ मध्ये, वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी, दुर्गाबाईंचा विवाह मुंबईतील प्रतिष्ठित खोटे घराण्यातील विश्वनाथ खोटे यांच्याशी झाला आणि त्यांचे नाव ‘दुर्गा’ असे ठेवण्यात आले. मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट राहिले, कारण सासू आनंदीबाई यांचा त्यांच्या शिक्षणाला विरोध होता. १९२५ मध्ये त्यांना बकुल हा मुलगा झाला, तर १९२७ मध्ये हरिनचा जन्म झाला. याच काळात, खोटे कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडली. या कठीण काळात दुर्गाबाईंना स्वतः अर्थार्जन करण्याची गरज जाणवली. त्यांनी इंग्रजीचे खाजगी वर्ग सुरू केले, पती विश्वनाथलाही नगरपालिकेत नोकरी मिळाली; परंतु ही मिळकत अपुरी होती.
१९३० मध्ये, योगायोगाने दुर्गाबाईंना ‘फरेबी जाल’ या मूकपटात एक छोटी भूमिका मिळाली. मात्र या चित्रपटामुळे त्यांची बदनामी झाली, ज्याचा त्यांच्या खाजगी शिकवणीच्या वर्गांवरही परिणाम झाला. त्या काळात उच्चभ्रू कुटुंबातील स्त्रियांनी चित्रपटांत काम करणे वर्ज्य मानले जाई. तरीदेखील, दुर्गाबाईंचे चित्रपटसृष्टीकडे आकर्षण वाढले.
१९३१ मध्ये, व्ही. शांताराम यांनी स्थापन केलेल्या ‘प्रभात फिल्म कंपनी’ने आपल्या पहिल्या मराठी बोलपट ‘अयोध्येचा राजा’ साठी दुर्गाबाईंना नायिका म्हणून आमंत्रित केले. वडिलांनी अनेक अटी घालून आणि स्त्रियांचा आदर राखला जाईल याची खात्री झाल्यानंतरच दुर्गाबाईंनी हा प्रस्ताव स्वीकारला.
कोल्हापूर येथे अयोध्येचा राजाचे चित्रीकरण सुरू झाले. शांताराम बापूंनी दुर्गाबाईंच्या मराठी आणि हिंदी उच्चारांत सुधारणा घडवून आणल्या. चालण्या-बोलण्यापासून ते अभिनयातील सूक्ष्म बारकाव्यांपर्यंत सर्व बाबींवर लक्ष ठेवून त्यांनी दुर्गाबाईंना मार्गदर्शन केले. दामले मामांनी आवाजावर नियंत्रण शिकवले, तर गोविंदराव टेंबेंनी संगीताची जबाबदारी सांभाळली. ‘अयोध्येचा राजा’ चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि त्यातील ‘तारामती’ची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. या चित्रपटाने दुर्गाबाईंना चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवून दिले. यानंतर, प्रभातच्या ‘माया मच्छिंद्र’ (१९३२) या चित्रपटात त्यांनी ‘राणी किलोताला’ची भूमिका साकारली. यासाठी त्यांना तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण घ्यावे लागले. हा चित्रपटही खूप चालला आणि हिंदी चित्रपटसृष्टीत दुर्गाबाईंचे स्थान बळकट झाले.
१९३४-१९३५ या काळात दुर्गाबाईंनी कलकत्त्यातील ‘न्यू थिएटर्स’साठी ‘राजराणी मीरा’, ‘सीता’, ‘इन्कलाब’ आणि ‘जीवन नाटक’ या चार चित्रपटांमध्ये काम केले. देवकी बोस यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे अनेक नवीन पैलू आत्मसात केले. ‘सीता’ हा ‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’मध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. याच काळात त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्यासोबतही काम केले. पृथ्वीराज कपूर आणि दुर्गाबाई यांच्यामध्ये बहीण-भावाचे नाते होते. कलकत्याच्या वास्तव्यात दुर्गाबाईंना रवींद्रनाथ टागोर यांची भेट घेण्याची संधी देखील मिळाली.
कलकत्त्याहून परतल्यावर, १९३६ मध्ये शांताराम बापूंच्या ‘अमरज्योती’ या चित्रपटात दुर्गाबाईंनी नायिकेची भूमिका साकारली. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हेनिस येथील फिल्मोत्सवात प्रशस्तिपत्र मिळाले आणि दुर्गाबाईंच्या अभिनयाची व्यापक प्रशंसा झाली.
१९३८ मध्ये विश्वनाथ खोटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी दुर्गाबाईंच्या खांद्यावर दोन मुलांच्या संगोपनाची आणि कुटुंबाच्या अर्थार्जनाची मोठी जबाबदारी आली. एका वर्षानंतर, १९३९ मध्ये, त्यांचे वडील; पांडुरंगराव लाड यांचेही निधन झाले आणि त्यांना मोठा आधार गमवावा लागला. या दुहेरी आघाताने त्या क्षणिक खचल्या, परंतु मुलांच्या भवितव्यासाठी आणि स्वतःच्या कारकिर्दीसाठी त्यांनी स्वतःला सावरून चित्रपटसृष्टीत झोकून दिले.
१९४३ मध्ये दुर्गाबाईंनी मोहम्मद रशीद यांच्याशी दुसरा विवाह केला. रशीद यांनी बकुलला सैन्यात नोकरी मिळवून दिली आणि हरिनच्या शिक्षणासाठीही मदत केली. मात्र, त्यांचे हे वैवाहिक जीवन फार काळ टिकले नाही.
१९४० ते १९६० हा दुर्गाबाईंच्या कारकिर्दीचा ‘सुवर्णकाळ’ ठरला. या काळात त्यांनी ७५ हून अधिक चित्रपटांत काम केले. याच काळात त्यांना आचार्य अत्रे, सोहराब मोदी, भालजी पेंढारकर, ऋषिकेश मुखर्जी यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
आचार्य अत्रेंचा ‘पायाची दासी’ (१९४१), ‘भरत मिलाप’ (१९४२), ‘पृथ्वीवल्लभ’ (१९४३), ‘महारथी कर्ण’ (१९४४) आणि ‘हम लोग’ (१९५१) यांसारखे अनेक चित्रपट या काळात गाजले. मात्र ‘मुघल-ए-आझम’ (१९६०) मधील ‘जोधाबाई’च्या भूमिकेमुळे त्यांच्या कारकिर्दीने कळस गाठला. तब्बल १६ वर्षांच्या निर्मिती प्रक्रियेतून साकारलेल्या या चित्रपटासाठी भव्य सेट, वेशभूषा, दागिने आणि बारीकसारीक तपशील यांवर प्रचंड मेहनत घेण्यात आली. हा चित्रपट प्रचंड गाजला, एवढेच नव्हे तर, तो १५ वर्षांहून अधिक काळ सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला. दुर्गाबाईंनी साकारलेली जोधाबाई प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवून गेली.
चित्रपटसृष्टीबरोबरच दुर्गाबाईंनी मराठी रंगभूमीवर आपले स्थान प्रस्थापित केले. ‘भाऊबंदकी’ आणि ‘कीचकवध’ यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. भाऊबंदकीचा दिल्लीत झालेला राष्ट्रीय नाट्यमहोत्सवातील प्रयोग अविस्मरणीय ठरला. पंडित जवाहरलाल नेहरूंसह अनेक दिग्गजांनी या प्रयोगाला हजेरी लावली. १९६१ मध्ये, दिल्लीत झालेल्या त्रेचाळिसाव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
माहितीपट निर्मिती क्षेत्रातही दुर्गाबाईंनी पाऊल टाकले. १९५२ मध्ये, रशीदसोबत त्यांनी ‘फॅक्ट फिल्म’ नावाची कंपनी सुरू करून अनेक सामाजिक माहितीपट निर्माण केले. त्यापैकी ‘परित्यक्ता – द डेझर्टेड वूमन’ आणि ‘दीपमाला’ या माहितीपटांना अफाट प्रशंसा मिळाली. त्यानंतर, जाहिरात-चित्रपट अधिक फायदेशीर वाटल्याने दुर्गाबाईंनी त्या क्षेत्रांकडे लक्ष वळवले. त्यांनी ‘दुर्गा खोटे प्रॉडक्शन्स’ (DKP) या स्वतःच्या निर्मिती संस्थेची स्थापना केली.
१९८० च्या दशकात, दूरदर्शनचा विस्तार होत असताना, दुर्गाबाईंनी लहान पडद्यावर पदार्पण केले. आर. के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’वर आधारित ‘वागळे की दुनिया’ या दूरदर्शन मालिकेची दुर्गा खोटे प्रॉडक्शन्सने (१९८८–१९९०) यशस्वी निर्मिती केली. या मालिकेमुळे त्यांना दूरदर्शन क्षेत्रात मोठी प्रसिद्धी मिळाली आणि त्यांची दूरदृष्टी पुन्हा एकदा सिद्ध झाली.
१९६१ ते १९८२ या काळात दुर्गाबाईंनी तब्बल ९० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करून आपल्या कामाच्या गतीमध्ये सातत्य राखले. हृषिकेश मुखर्जींबरोबर ‘आनंद’, ‘बावर्ची’, ‘अभिमान’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. राज कपूर दिग्दर्शित बॉबी (१९७३) या यशस्वी चित्रपटात त्यांनी साकारलेली मिसेस ब्रिगॅंझाची भूमिका अतिशय गाजली. बिदाई (१९७४) या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा उत्कृष्ट सह-अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सुभाष घई यांच्या ‘कर्ज’ (१९८०) मधील रवी वर्मा (राज किरण) यांच्या आईच्या भूमिकेची देखील खूप प्रशंसा झाली. दौलत के दुश्मन (१९८३) हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.
१९८३ मध्ये, दुर्गाबाईंना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान; दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुर्गाबाईंनी पन्नास वर्षांहून अधिक काळ दिलेल्या अतुलनीय योगदानाचा हा यथोचित गौरव होता.
दुर्गाबाईंना त्यांचे कौटुंबिक जीवन त्यांच्या व्यावसायिक जीवनाइतकेच महत्त्वाचे होते. मुलगा बकुल एअर इंडियात उच्च पदावर पोहोचला. त्याची पत्नी टीना पोलिश-कॅनडियन वंशाची होती. धाकटा मुलगा हरिनचे १९६४ मध्ये निधन झाले, परंतु त्याची पत्नी विजया मेहता या नामांकित रंगमंच आणि दूरदर्शन दिग्दर्शिका बनल्या. दुर्गाबाईंची नातवंडे, अंजली, रवी आणि देवेन खोटे यांनी देखील मनोरंजन उद्योगात आपले स्थान निर्माण केले. विशेषतः देवेन खोटे हे दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीतील यशस्वी निर्माता म्हणून ओळखले गेले. त्यांची पुतणी शुभा खोटे आणि पुतण्या विजू खोटे हेही लोकप्रिय कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले.
१९८२ मध्ये दुर्गाबाईंनी ‘मी, दुर्गा खोटे’ हे मराठीत आत्मचरित्र लिहिले. त्यात त्यांनी आपल्या व्यावसायिक आणि कौटुंबिक प्रवासाचे प्रामाणिक आणि अंतर्मुख करणारे चित्रण केले आहे. त्याचे शांता गोखले यांनी केलेले इंग्रजी भाषांतर ‘I, Durga Khote’ दुर्गाबाईंच्या मरणोत्तर प्रकाशित झाले.
आपल्या आत्मचरित्रात दुर्गाबाई लिहितात, “मी दुःखी नव्हते... आयुष्यातील सर्व इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि चुका यांची बेरीज-वजाबाकी केली तर शिल्लक ‘समाधान’ असेच होते.” मुलांचे कल्याण ही त्यांची नेहमीची एकमेव चिंता होती. मुले स्वावलंबी आणि आनंदी राहावी, यात त्यांना खरा आनंद होता.
आपल्या उत्तरायुष्यात दुर्गाबाई अलिबाग येथे स्थलांतरित झाल्या. २२ सप्टेंबर १९९१ रोजी मुंबईत वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या एका देदीप्यमान कारकिर्दीचा अंत झाला. ऋषिकेश मुखर्जींसारख्या अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
२००० मध्ये, ‘इंडिया टुडे’ मासिकाने दुर्गाबाईंना “भारताला आकार देणाऱ्या १०० व्यक्तींपैकी एक” म्हणून घोषित केले. २०१३ मध्ये भारत सरकारने दुर्गाबाईंच्या नावाने टपाल तिकीट जारी करून त्यांच्या योगदानाचा सन्मान केला.
दुर्गा खोटे यांचा जीवनप्रवास म्हणजे दृढनिश्चय, कलात्मक उत्कृष्टता आणि सामाजिक धाडसाचे एक अप्रतिम उदाहरण आहे. त्यांनी केवळ स्वतःच्या कलेत उत्कृष्ट कामगिरी केली नाही, तर समाजातील रूढीवादी विचार मोडून, महिलांसाठी एक नवा मार्ग निर्माण केला. भारतीय चित्रपटसृष्टी आणि सांस्कृतिक इतिहासात त्या एक प्रेरणास्रोत म्हणून कायम स्मरणात राहतील.
टीप: वेबसाईटवरील माहिती दुर्गा खोटे यांच्या आत्मचरित्रावरून घेतली आहे